तभा फ्लॅश न्यूज/पुणे : पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीने जोर धरला आहे. आमदार रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते रात्रीपासून पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाली.
पाहा काय आहे नेमकं प्रकरण :
रविवारी सकाळी तीन मुलींनी काही सामाजिक कार्यकर्त्यांसह कोथरुड पोलिसांवर छळ केल्याचा आरोप केला होता. यामध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचे त्यांनी म्हटले. या मुलींवर एका व्हीआयपी केसच्या संदर्भात दबाव टाकण्यात आला आहे अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळात काही सामाजिक संघटना आणि राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचले. आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते. त्यांनी अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी पहाटे ३.३० पर्यंत चर्चा केली. परंतु, चर्चेनंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
दरम्यान, राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट म्हणाले…
आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट करून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह केला. यामध्ये ते म्हणाले की, एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली.
आमदार रोहित पवार यांनी मागणी केली की, या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व पोलिसांवर गुन्हा दाखल करावा. तसेच, या प्रकरणावर दबाव आणणाऱ्या व्हीआयपी व्यक्तीची आणि निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची चौकशी व्हावी.