सोलापूर – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने भिगवण गुड्स शेडमध्ये ‘स्टील बार’ ची यशस्वीपणे हाताळणी सुरू करून मालवाहतूक विकासाच्या उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नव्याने कार्यान्वित केलेल्या हाताळणी मार्गावर परिसराचा विकास पूर्ण झाल्यानंतर ही प्रगती साधली आहे. हे स्टिल बार्स बारामती येथील किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी हाताळण्यात आले, ज्यामुळे भिगवण येथे मालवाहतुकीच्या एका नवीन प्रवाहाची सुरुवात झाली आहे.
हा माल उतरवण्याचे काम बिजनेस डेव्हलपमेंट युनिटच्या पुढाकाराने करण्यात आले, जे विभागाची मालवाहतूक श्रेणी विस्तारण्याची आणि रेल्वे-आधारित लॉजिस्टिक्स उपायांना प्रोत्साहन देण्याची वचनबद्धता दर्शवते. स्टील बारने भरलेली ४६ ब्रॉड गेज बोगी ओपन स्टील वॅगन वॅगनची पहिली मालगाडी जिंदाल साइडिंग, बिलासपूर (छत्तीसगड) येथून प्राप्त झाली आणि भिगवण गुड्स शेडमध्ये आणण्यात आली.
पायाभूत सुविधांमध्ये वाढ, विशेषतः परिसराचा विकास, वाहनांची सुरळीत वाहतूक आणि मालाची कार्यक्षम हाताळणी सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आला आहे, ज्यामुळे मालवाहतूक ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळतील.
माल उतरवण्याच्या कामादरम्यान, वाणिज्य, कॅरेज अँड वॅगन आणि इलेक्ट्रिकल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी कामावर बारकाईने लक्ष ठेवले आणि सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित केले. सुरक्षित कार्यपद्धतींवर भर देण्यात आला आणि सुरक्षित कार्यान्वयन वातावरण राखण्यासाठी कामगारांना सुरक्षेच्या पैलूंबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर यांनी पुणे, बारामती आणि सोलापूर परिसरातील एमआयडीसी मधील उद्योजकांना भिगवण येथील नुकत्याच अद्ययावत केलेल्या मालधक्क्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
हा उपक्रम पायाभूत सुविधांमध्ये वाढ, ग्राहक-केंद्रित मालवाहतूक सेवा आणि मालवाहतुकीमध्ये शाश्वत वाढ या दिशेने सोलापूर विभागाचा सक्रिय दृष्टिकोन दर्शवतो. भिगवण गुड्स शेडमध्ये स्टील बार उतरवण्यास सुरुवात झाल्यामुळे विभागाच्या मालवाहतूक पोर्टफोलिओला आणखी बळकटी मिळेल आणि महसूल वाढीस सकारात्मक हातभार लागेल अशी अपेक्षा आहे.


















