आमदार राम सातपुते यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भात आमच्याकडे दोन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने तो व्हिडिओ पाहिला जाईल आणि त्यानुसार चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविला जाईल, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी दीपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण, त्यापूर्वी त्यांनी अमरावती, नागपूर व विजयपूर येथे देखील अर्ज दाखल केले होते. निवडणूक आयोगाच्या संहितेनुसार एका उमेदवाराला केवळ दोन मतदारसंघातूनच निवडणूक लढविता येत असतानाही त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दुसरीकडे लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी प्रतिज्ञापत्रात स्वयंघोषणापत्र देताना त्यात दोनपेक्षा अधिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज न भरल्याची माहिती खोटी दिली तथा लपविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला, पण त्यांनी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांच्यावर एफआयआर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.