सोलापूर : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक निरीक्षक नयना गुंडे आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील मतदानपूर्व तयारीची पाहणी केली. एस.आर.पी. कॅम्प, मेहता प्रशाला व शासकीय तंत्रनिकेतन येथील ईव्हीएम वितरण केंद्रे, स्ट्राँगरूम तसेच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेची तपासणी करण्यात आली.
मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. मतदानासाठी सर्व सात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील ठिकाणी ईव्हीएम व आवश्यक साहित्याचे वितरण पूर्ण झाले आहे. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने बसची स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा, वाहतूक व मूलभूत सुविधांची योग्य आखणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

















