सोलापूर : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “बौद्धिक संपदा हक्क (IPR): पेटंट(ing) आणि त्यापलीकडे – एक सूक्ष्म समज” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि उद्योजक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविण्यात आला.
कार्यशाळेचे प्रमुख अतिथी डॉ. उमेश बनकर (बनकर कन्सल्टिंग सर्व्हिसेस, गोवा) यांनी पेटंटची मूलभूत तत्त्वे, पेटंटयोग्यता, संशोधनाचे आविष्कारात रूपांतर, पेटंट क्लेम कन्स्ट्रक्शन तसेच एआय आणि आयपी यातील परस्परसंबंध यावर सखोल मार्गदर्शन केले.
या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत ओमान, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधील एकूण 106 जण सहभागी उपस्थित होते. पेटंट प्रक्रियेत केवळ बाजारपेठेची दृष्टी पुरेशी नसून तंत्रज्ञान, नवकल्पना आणि व्यवसाय यांचा योग्य समन्वय आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तसेच वैज्ञानिकांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य डॉ. एस. डी. नवले, सीआरटीडीचे डायरेक्टर डॉ. एस. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. के. एस. पाटील, संयोजक डॉ. आय. एम. चंदरकी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाली.
समारोप सत्रात सहभागींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजकांच्या बौद्धिक संपदा हक्काविषयीची समज वाढून नवकल्पना, संशोधन व व्यवसाय सुरक्षित ठेवण्यास निश्चितच मदत लाभणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मानसी जाधव यांनी केले.
कार्यशाळेतून विविध विषयांवर सविस्तर चर्चा
कार्यशाळेत बौद्धिक संपदा क्षेत्रातील अद्यावत माहिती, संकल्पना आणि अभ्यास सत्रे अनुभवता आली. नवीन तंत्रांकडे, कायदेशीर बाबीकडे आणि व्यावहारिक ज्ञानाकडे पाहण्याची आणि शिकण्याची संधी या उपक्रमात मिळाली. बौद्धिक संपदा हक्कांची मूलभूत माहिती, पेटंटबिलिटी : काय पेटंट होऊ शकते? वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून संशोधनाचे रूपांतर पेटंट प्रणाली या विषयी सविस्तर माहिती मिळाली.



















