मोहोळ : खंडाळी ता. मोहोळ येथे ग्रामपंचायत कार्यालय व स्व. प्रभाकर मुळे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्या, आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला तसेच विविध क्षेत्रातील सुमारे १०० ते १५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच लता प्रभाकर मुळे होत्या, तर तुंगत ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच डॉ.अमृता आबा रणदिवे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात औदुंबर मुळे यांनी “सशक्त नारी सशक्त समाज” या विषयावर विचार मांडत महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नसल्याचे प्रतिपादन केले.
डॉ. अमृता रणदिवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्री-पुरुष समानता, महिलांचे हक्क, तसेच समाजामध्ये महिलांच्या प्रश्नांविषयी जागरूकता असण्याची गरज यावर प्रकाश टाकला. महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले.
यावेळी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा स्पर्धा, उखाणे अशा विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.























