भोकरदन / जालना : माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भोकरदन नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती मा.आ. चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. संजय काळबांडे, पक्षाचे सरचिटणीस नंदकुमार देशमुख, युवानेते सुधाकर दानवे, तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या.
याप्रसंगी पक्षाच्या धोरणांबाबत, नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रूपरेषा, प्रभागनिहाय विकास आराखडे आणि उमेदवार निवडीचे निकष या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी, कार्यकर्त्यांच्या मतांची दखल घेत, योग्य व जनतेशी घट्ट नाळ असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
नगरपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जोरदार तयारीसह आणि शिस्तबद्ध संघटनात्मक ताकदीने मैदानात उतरला असुन प्रभागनिहाय जनसंपर्क, विकासाच्या योजना आणि स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत पक्षाने नागरिकांचा विश्वास संपादन करण्याचे ध्येय ठेवले आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदासाठी पाच जणांनी तसेच नगरसेवक पदासाठी एका प्रभागातून सात ते आठ व एका वार्डातून तीन ते चार इच्छुक उमेदवारांनी अशा सर्वच प्रभागातून 71 इच्छुक उमेदवारांनी आपले समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनासह कार्य, जनसंपर्क व विकास दृष्टिकोन सादर करत पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांच्या मतदारसंघातील कार्याची सखोल पडताळणी करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रसंगी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
“नगरपरिषद निवडणूक ही स्थानिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या एकजुटीवर, जनतेच्या विश्वासावर आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारधारेवर आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हा नगरपरिषदेत आपले वर्चस्व निश्चितपणे सिद्ध करणार असल्याचे मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांनी यावेळी सांगितले.
मुलाखती दरम्यान शहरातील उद्योजक भाजपाचे कार्यकर्ते योगेश नंदकुमार शर्मा, सामाजिक कार्यकर्ते सुनिल खिरे, राजु खिरे, धनराज भारती, रफिक कादरी, एमआयएमचे कार्यकर्ते आसिफ कुरेशी (गज्जुभाई) यांनी मा.आ.चंद्रकांत पुंडलिकराव दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.




















