जालना / अंबड – दि 9 नोव्हेंबर जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात भाजपाचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिले आहे. हा घोटाळा प्रकरणातील तपास पूर्णपणे भरकटला असून पोलिसांना सर्व आरोपींचे पत्ते माहीत असतानाही त्यांना अटक करण्यात येत नाही असे सांगत लोणीकर यांनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून तत्कालीन आरडीसी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अंबड तहसीलदार आणि घनसावंगी तहसीलदार यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झालेले नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व आरोपींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत त्यांची संपत्ती जप्त करावी आणि झालेल्या अपहाराची संपूर्ण रक्कम वसूल करावी अशी मागणी त्यांनी केली असून ही मागणी डिसेंबर महिन्यात नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात जोरदारपणे मांडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमावे अशी मागणीही ते लावून धरणार असून लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.
घोटाळ्याचा पर्दाफाश आमदार बबनराव लोणीकरांच्या प्रयत्नांतूनच
हा संपूर्ण अनुदान घोटाळा प्रकरणाचा पर्दाफाश आमदार बबनराव लोणीकर यांच्या खास आणि सततच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाला असून शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला माफ करणार नसल्याचा स्पष्ट आणि कठोर निर्वाळा त्यांनी दिला आहे. गेल्या काही वर्षांत जालना जिल्ह्यात अतिवृष्टी पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यासाठी शासनाच्या चार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र महसूल कृषी आणि पंचायत विभागातील काही बेईमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट खोटी कागदपत्रे आणि शेतकऱ्यांच्या नावाने दुबार अनुदान तयार करून ही रक्कम स्वतःच्या खिशात घातली. चौकशी समितीच्या अहवालानुसार एकट्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातच सुमारे सत्तर कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाला असून जिल्ह्याच्या इतर भागांचा विचार केला तर हा आकडा शंभर कोटींच्या आसपास जातो असे लोणीकर यांनी यापूर्वीच सांगितले होते.
सात आरोपींना अटक झाली असली तरी एकवीस जण अद्याप फरार
आतापर्यंत या प्रकरणात सुमारे सात आरोपींना अटक झाली असली तरी एकवीस जण अद्याप फरार आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे सांगत आहेत. मात्र लोणीकर यांच्या मते हा तपास जाणीवपूर्वक मंदावला जात असून प्रमुख सूत्रधारांना वाचवले जात आहे. तत्कालीन तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांची नावे चौकशीत समोर आली असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत असा सवाल उपस्थित करत लोणीकर यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनावरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता आणि आता थेट विधानसभेत हा विषय उचलून धरणार असल्याने सरकारला या प्रकरणात तातडीने कारवाई करावी लागणार आहे.
शेतकरी संघटना आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीही या घोटाळ्याची सीबीआय किंवा एसआयटी चौकशी करण्याची मागणी वारंवार केली आहे कारण खरे नुकसानग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले तर भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये लाटले. आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच आवाज उचलला असून गेल्या पस्तीस वर्षांपासून ते शेतकरी हितासाठी झटत आहेत असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
या घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून आमदार बबनराव लोणीकरांच्या पुढाकाराने न्याय मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. हिवाळी अधिवेशनात हा विषय ऐरणीवर आल्यानंतर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण हा केवळ जालना जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण मराठवाड्यातील शासकीय योजनांमधील भ्रष्टाचाराचा एक मोठा उदाहरण ठरला आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले की शेतकऱ्यांच्या प्रत्येक पैशाची वसुली होईपर्यंत आणि सर्व दोषींना शिक्षा होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत. जालना जिल्ह्यातील शेतकरी या नेत्याच्या पाठीशी उभे राहतील अशी भावना व्यक्त होत आहे.




















