पंढरपूर – शहरातील मुख्य प्रदक्षिणा मार्गावर अगदी काळामारुती चौकालगत पालिकेची मुलींची शाळा नं.६ ही कित्येक वर्षापासून कार्यरत आहे. गेल्या दोन, चार वर्षाखाली या शाळेच्या इमारतीच्या दूरुस्तीचे देखील काम केले गेले आहे. त्यामुळे या शाळेचे रुपडे काहीसे बदलले दिसत आहे. मात्र सध्या ही शाळा आहे की चक्क शेळीपालन केंद्र असा सवाल पालकवर्गातून
उपस्थित होत आहे. कारण या शाळे मध्ये चक्क शेळी बांधली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
एकीकडे येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांनी नुकताच नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला आहे. त्या अगोदर सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिवशी शहरातील सर्व पालिकेच्या शाळांना भेटी देवून त्यांनी शाळांची पाहणी देखील केलेली आहे. या वेळी ज्या त्या शाळेतील शिक्षकांना शाळे मध्ये असणाऱ्या समस्यां,अडचणींची माहिती लिखित स्वरुपात आपल्याकडे द्यावी असे देखील आवाहन त्यांनी केलेले आहे.
नगराध्यक्षा डाँ.भालकें यांच्या या कृतीमुळे गोरगरीबांची मुले शिक्षण घेत असलेल्या शहरातील पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या प्राथमिक शाळांच्या सुधारणांसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले जातील असा काहीसा विश्वास पालकांमधून निर्माण झाला आहे. एकीकडे नगराध्यक्षांकडून अशा प्रकारची कृती करुन गोरगरीब मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सकारात्मकता दाखविली जात असतानाच दुसरीकडे मात्र प्रदक्षिणा रस्त्यावरील मुलींची शाळा नं.६ ही कित्येक वर्षापासूनची जुनी शाळा कार्यरत आहे. मध्यंतरीच्या काळात या शाळेच्या दूरुस्तीचे काम हाती घेवून शाळेच्या इमारतीचा चेहरामोहरा बदलला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणूकीच्या वेळी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी या शाळेतच मतदान केंद्र देखील कार्यरत करण्यात आलेले होते.
मात्र सध्या या शाळेला भेट दिली असता ही शाळा आहे की शेळीपालन केंद्र असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे. कारण या शाळेत चक्क शेळीपालन केले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ही शाळा नव्हे तर शेळीपालन केंद्रच आहे की काय असे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या मालकीच्या या इमारतीत नव्यानेच हे शेळीपालन केंद्र कुणी सुरु केले आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची पालिकेच्या आधिकाऱ्यां कडून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
———————
फोटोओळी : पंढरपूर : शहरातील प्रदक्षिणा मार्गावर अगदी काळामारुती चौकालगत असलेल्या पालिकेच्या मालकीच्या मुलींच्या शाळा नं.६ च्या इमारती मध्ये चक्क शेळी बांधलेली दिसत आहे. त्यामुळे ही शाळा आहे की शेळीपालन केंद्र असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे.


















