बारामतीत कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार यांनी हद्द ओलांडली. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची याचना करणं हे कितपत योग्य आहे, असा सवाल करताना आपल्या काकांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
लोकसभा निवडणुकीवेळी तुम्हाला भावनिक आवाहन करतील, शेवटची निवडणूक असल्याचं सांगतील, खरंच त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल ते माहिती नाही. पण मतदारांनो तुम्ही भावनिक होऊ नका, असे विधान करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डिवचलं होतं. अजित पवार यांच्या या विधानावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. “अजित पवार यांचं हे विधान चीड आणणारं आहे, तितकंच संतापजनक आहे. आपल्या काकाची मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.
बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची शाळा घेतली. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना भावनिक विचार करू नये, असे सांगताना व्यावहारिकरणे गोष्टींना बघा असा सल्ला अजितदादांनी दिला. आगामी निवडणूक काळात काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? हे माहिती नाही, असे वक्तव्य करून अजितदादांनी शरद पवार यांना डिवचलं. त्यांच्या याच विधानावर आव्हाड यांनी तीव्र आक्षेप नोंदवित संताप व्यक्त केला.

























