रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरात शुक्रवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. मॉस्कोच्या किनाऱ्यावरील कॉन्सर्ट हॉलमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 60 जण मृत्यूमुखी पडले असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इजिप्त एण्ड सिरीया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.
मॉस्कोमध्ये शुक्रवारी रशियन रॉक बँड पिकनिकच्या परफॉर्मन्ससाठी गर्दी जमली असताना हा हल्ला झाला. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने सांगितले की, या हल्ल्यात 60 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 150 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी स्फोटके फेकल्यानंतर लागलेल्या आगीत आणखी लोक अडकले असण्याची शक्यता काही रशियन वृत्तपत्रांनी व्यक्त केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी 145 जखमींची यादी जाहीर केली. त्यापैकी 115 जण रुग्णालयात दाखल असून यात 5 बालकांचा समावेश आहे. सैनिकांच्या वेशात अनेक जण कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्यांवर गोळीबार केला. रशियन माध्यमांनी आणि टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वारंवार गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे.
एका व्हिडिओत रायफल घेऊन दोन जण कॉन्सर्ट हॉलमध्ये फिरताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या व्हिडिओत प्रेक्षागृहातील दहशतवाद्यांनी सभागृहाला आग लावल्याचे एक व्यक्ती सांगत आहे. अन्य व्हिडिओमध्ये 4 दहशतवादी असॉल्ट रायफल घेऊन पॉईंट ब्लॅंक रेंजवर ओरडणाऱ्या लोकांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत. रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉस्कोचे विमानतळ, रेल्वे स्थानके आणि राजधानीतील भुयारी मार्गावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. रशियाच्या इतर भागांनीही सुरक्षा व्यवस्था कडक केली.रशियाच्या काही लोकांनी यामागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याच्या काही तास आधी रशियन लष्कराने युक्रेनच्या वीज यंत्रणेवर जोरदार हल्ला चढवला होता. ज्यामुळे देशातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आणि इतर ऊर्जा सुविधा कोलमडल्या होत्या. ज्यामुळे दहा लाखांहून अधिक लोकांना विजेपासून वंचित राहावे लागले.
दरम्यान मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मॉस्कोतील भीषण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे मोदी यांनी ट्विटरवर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या दु:खाच्या क्षणी भारत सरकार आणि रशियन फेडरेशनच्या जनतेच्या पाठीशी उभा असल्याचे मोदींनी म्हंटले आहे.