सोलापूर – महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, बाळे, येथील ज. रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविदयालय ही विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानवृद्धीबरोबरच सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जाणीव विकसित करणारी एक उपक्रमशील संस्था म्हणून ओळखली जाते. याच परंपरेत सन २०२५-२६ मध्ये शाळेतर्फे एक भव्य शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आपल्या देशातील महान संस्कृती, अध्यात्मिक वारसा, ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व, तसेच त्यामागील परिश्रम आणि निसर्गसौंदर्याची जाण करून देणे हे आहे. या शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांचा ताफा बुधवार,दिनांक १२ नोव्हेंबर रोजी मार्गस्थ झाला.
या सहलीत जालंधर, अमृतसर, वाघा बॉर्डर, चंदीगड, शिमला आणि दिल्ली या विविध ऐतिहासिक व पर्यटनस्थळांना भेट देण्यात येणार आहे. सहलीचे आकर्षण म्हणजे दिल्ली ते मुंबई विमान प्रवास. विद्यार्थ्यांना इंडिगो कंपनीच्या ६ए-६०२२ या विमानाने प्रवास घडविण्यात येणार आहे. सहलीत 9 विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच 1 शिक्षिका अशा 10 जणांचा सहभाग आहे.
संपूर्ण सहलीचे नियोजन प्राचार्य मोहनराव घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शैक्षणिक सहलीसाठी संस्थेचे अध्यक्ष सचिन ठोकळ, सचिवा शिल्पा ठोकळ, संचालक दत्ता गाजरे यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

















