सोलापूर – ग्रामीण भागातील ग्रामस्थांचा लोक सहभाग अधिक दृढ करणे, पाणी पुरवठा योजनाचे संचालन आणि देखभाल यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे आणि प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी वचन बद्धकरिता जल जीवन मिशन अंतर्गत योजना गावाला हस्तांतरण दिवस जल अर्पण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध पुरेसे पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची काम प्रगती पथावर सुरू आहेत.गावातील जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेल्या योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात येत आहे.जिल्हयातील तोरानी (ता.अक्कलकोट) व अरळी (ता.मंगळवेढा) या गावातील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे.सदरची योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर दोन गावात जल अर्पण दिवस गावात साजरा करण्यात येणार आहे.
यामध्ये गावातील पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देऊन योजना कायमस्वरूपी ठेवण्यासाठी देखभाल दुरुस्तीची हमी घेण्यात येणार आहे.गावात उत्सव साजरा करताना पाण्याचे महत्व ग्रामस्थांना कळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांची गावातून रॅली, जल प्रतिज्ञा, गावाला मिळणारी शुद्ध पाण्याची हांडे सजवून गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.शुद्ध पाण्यासाठी (एफ.टी.के.) किटचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमात महिला बचत गट, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक व युवकाचा सहभाग घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गावात जल जीवन मिशनचे काम पूर्ण करून पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्यासाठी गावात जल अर्पण दिवस साजरा करावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेटटी यांनी केले आहे.
रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी जल अर्पण दिवस तोरानी (ता.अक्कलकोट) व अरळी (ता.मंगळवेढा) या दोन ग्रामपंचायतमध्ये साजरा करण्यात येणार आहे.






















