नांदेड / देगलूर : येथील स्वच्छतेचा जागर ग्रूपतर्फे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त येथील लेंडी नदीच्या विसर्जन घाटावर ०५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य दीपोत्सव व संगीत सोहळा संपन्न झाला. यावेळी सुंदर रांगोळ्या, दिव्यांची आरास, रोषणाई आणि संगीताच्या मैफलीने वातावरण आनंदमय झाले होते.
यावेळी शहरातील अनेक महिला व पुरुष नागरिक सहकुटुंब उपस्थित राहून दिव्यांची आरास केली. दीपोत्सवाचा हा तिसरा वर्ष होता. दिवे लावल्यानंतर सामूहिक रित्या नदी पूजन व आरती करण्यात आली. या कार्यक्रमात हजारो महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. सुंदर रांगोळ्या व फुलांनी दिव्यांची आरास व रोषणाई करण्यात आली.
यावर्षी प्रथमच दिपोत्सवच्या कार्यक्रमासह संगीत साधना मंच देगलूर यांच्या वतीने आयोजित स्थानिक कलाकारांचा भक्तीगीत व भावगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा आनंद रसिकांना घेता आला.
संगीत साधना मंच तर्फे आयोजित गीत गायन कार्यक्रमात डॉ. सुनील जाधव, सौ. सुजाता कुलकर्णी, .सौ. रमाताई देशपांडे, शितल कुलकर्णी, बाळासाहेब पाटील,बलराज पटणे, यशवंत काब्दे,गोविंद सुवर्णकार, बाळासाहेब पाटील, शिवानंद स्वामी, सौ. सुवर्णा केळगिरे, बालराज ग्रंथमवार, विजय दासरवाड, प्रसिद्ध बासरीवादक एन्नोदिन वारसी, बालाजी सुगावकर, प्रसिद्ध तबलावादक गंगाधर सुगावकर आदींनी एकापेक्षा एक सरस भावगीत व भक्तिगीते सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दीपोत्सव व गीत गायन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वच्छतेचा जागर समिती व संगीत साधना मंच देगलूर चे अध्यक्ष लक्ष्मण अमृतवार व सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम केले. यावेळी पोलिस निरीक्षक मारोती मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.




















