नायगाव – तालुक्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी, सत्यनिष्ठा आणि निर्भीड लेखणीचा ठसा उमटविणारे ज्येष्ठपत्रकार कै. सुभाष पेरकेवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
नरसी येथील दैनिक प्रजावाणीचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना सातत्या ने वाचा फोडली.
कै.सुभाष पेरकेवार यांनी सुमारे २५ वर्षे पत्रकारितेत कार्यरत राहून शेतकरी, कष्टकरी, वंचित व उपेक्षित घटकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे समाजासमोर मांडल्या. अनेक सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची ठरली आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, निर्भीडपणा आणि सामाजिक जाणीव हीच त्यांच्या पत्रकारितेची खरी ओळख होती.
या दुःखद घटनेनंतर नायगांव तालुक्यातील मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि. २४ डिसेंबर रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहाच्या भव्य प्रांगणात कै. सुभाष पेरकेवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या श्रद्धांजली सभेस मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपत्रेवार, माजी तालुकाध्यक्ष माणिक लोहगांवे, लक्ष्मण बर्गे, उपाध्यक्ष गोविंद टोकलवाड यांच्यासह पत्रकार,लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी उभे राहून एक मिनिट मौन पाळून कै.पेरकेवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी विविध दैनिकांचे प्रतिनिधींनी कै. सुभाष पेरकेवार यांच्या पत्रकारितेतील आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. त्यांच्या निर्भीड लेखणीने ग्रामीण समाजाला दिशा दिली, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कै.सुभाष पेरकेवार यांच्या अकाली जाण्याने.नायगांव तालुक्यातील पत्रकार संघ पोरका झाला असून, त्यांचे कार्य व विचार भावी पिढीतील पत्रकारांसाठी दीपस्तंभ ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या श्रद्धांजली कार्यक्रमाला गंगाधर भिलवंडे, आनंदराव सूर्यवंशी, शेषेराव कंधारे, गंगाधर गंगासागरे, दिलीप वाघमारे,जाफर भाई,नागेश कल्याण, माधव बैलकवाड, देविदास सुर्यवंशी, आजिमभाई ,तानाजी शेळगांव कर,हाणमंत चंदनकर मारोती सुर्यवंशी, प्रकाश महिफळे,कैलास तेलंग,अंकूश देगांवकर, किरण औराळकर,शाम चोंडे, आरिफ भाई ,प्रमेश्वर जाधव , हाणमंत चंदनकर, निळकंठ जाधव सह, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ जिगळेकर, माधव कोरे, मारोती मेटकर, धम्मदीप भद्रे, माधवराव चिंतले, साईनाथ सह अनेक दै. वृत्तपत्राचे प्रतिनिधी व सोशल मिडियाचे प्रतिनिधी सह सामाजिक क्षेत्रा तील ही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















