फोंडशिरस — प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर फोंडशिरस येथील काजल विलास भोसले हिने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून तिने राज्यात अकरावा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे फोंडशिरस गावासह संपूर्ण तालुक्याच्या अभिमानात भर पडली आहे.
अत्यंत साध्या कुटुंबातील काजल हिने वडील विलास भोसले आणि माता बेबीताई भोसले यांच्या प्रेरणेतून शिक्षणाचा ध्यास घेत सातत्याने अभ्यास केला. तिच्या यशात पालकांचा त्याग आणि संस्कारांचा मोठा वाटा असल्याचे काजलने सांगितले.
काजलच्या यशाचा गौरव म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), माळशिरस तर्फे तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मानाचा फेटा,शाल, हार देऊन अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी रिपाइं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे यांनी दूरध्वनीद्वारे काजलचे अभिनंदन करत तिच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, तालुका सहसंघटक दिनेश भोसले, संतोष बनसोडे, प्रमोद भोसले, अनिकेत निचळ, सौरभ रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

























