करकंब : करकंब ते उंबरे करोळे ता.पंढरपूर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे व चाऱ्या पडल्याने, पट्ट्यांचे मुरमीकरण न झाल्याने,रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या झाडाझुडपांच्या फांद्यांमुळे या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांसह वाहनचालकांचे हाल होत आहेत.या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहन चालवावे लागत आहे.
श्रीपुर येथील साखर कारखान्याकडे जाणारा शेतकरी वर्ग,अकलूज परिसरात जाणारा व्यापारी वर्ग,शिखर शिंगणापूर व पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जाणारे भाविक तसेच या भागातील व्यापारी,नागरिक,विद्यार्थी, नौकरदारवर्ग,शेतकरी याच रस्त्यावरून प्रवास करत असतात.त्यामुळे येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.या रस्त्यावरून पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर,विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट नंबर २,श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे या साखर कारखान्यांना ऊस घेऊन जाणारी वाहनेही या रस्त्यावरूनच ये,जा करत असतात.साईड पट्ट्यांचे मुरमीकरण न झाल्याने संबंधित वाहनांच्या पुढे जाण्यासाठी पाठीमागील वाहनधारकांना कसरत करत,जीव मुठीत धरूनच सदरच्या वाहनास ओलांडून पुढे जावे लागत आहे.
या खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होऊन कोणी जखमी किंवा मृत होण्याअगोदरच संबंधित ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्डे व चाऱ्या बुजवणे,साईड पट्ट्यांचे मुरमीकरण करणे,झाडाझुडपांच्या फांद्या काढून वाहन चालकांचा प्रवास निर्धोक व सुरक्षित व्हावा यासाठी ही सर्व कामे लवकरात लवकर करण्यात यावीत अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणारे विद्यार्थी,नागरिक, व्यापारी,भाविक,शेतकरी,प्रवासी व वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.या रस्त्यावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते तरीही याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिक व वाहन चालकांकडून देण्यात आला आहे.
या रस्त्याची गुणवत्तापूर्वक व योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्यास सोलापूर ते अकलूज,मोडलिंब ते अकलूज, कुर्डूवाडी ते अकलूजमार्गे शिखर शिंगणापूर अशा अनेक एसटीच्या फेऱ्या सुरू होतील.या एसटी बसेस चालू झाल्यास या मार्गावरील शेतकरी,व्यापारी,भाविक,नागरिक वाहनचालक,विद्यार्थी यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. मोडलिंब, करकंब, जळोली, उंबरे करोळे,श्रीपुर या भागातील नागरिक अकलूज तसेच माळशिरस,नातेपुते शिखर शिंगणापूर येथे जाण्यासाठी याच मार्गावरून प्रवास करत असतात.
या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वृद्ध,रुग्ण,गरोदर महिला यांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.करकंब येथे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.या खराब रस्त्यामुळे त्यांना शालेय शिक्षण घेण्यासाठी जाणेही कठीण झाले आहे.



















