पंढरपूर – कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. कार्तिक यात्रा सोहळयासाठी सुमारे आठ ते दहा लाख भाविक पंढरपूरला येतात. भाविकांची सुरक्षितता व यात्रा सुकर होणेचे दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन अधिनयम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर ते पुढे महाद्वार चौक परीसर दि.२७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ५.०० वाजेपासून ते रात्री १०.०० वाजेपर्यंत व दि. ०१ ते ०५ नोव्हेंबर या कालावधीत २४ तास या वेळेकरीता सदर परीसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कुमार आशीर्वाद यांनी पारित केला आहे.
कार्तिकी यात्रा कालावधीत शहरात येणा-या भाविकांची संख्या पाहता, श्रीकृष्ण मंदीर, चाफाळा त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर, पुढे महाद्वार चौक परीसर या भागात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात असते. तसेच या भागातून भाविक दर्शनरांगेकडे व मंदिराकडे पायी चालत जात असतात. अशावेळी ब-याच ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर, जागोजागी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केलेले असतात,यामुळे रस्ता अरूंद होवून भाविकांना रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. येणा-या दुचाकी, चारचाकीमुळे अपघात होण्याची जास्त शक्यता असून वाहनांमुळे रस्त्यावर गर्दी वाढून रहदारीच्या समस्या निर्माण होतात. गर्दी व्यवस्थापनाकरीता प्रशासनास अडचणी निर्माण होतात. शहर व परीसरातील वाहतूक व दर्शनरांग सुरळीतपणे चालणेसाठी व यात्रा कालावधीत शांतता व सुरक्षितता राहावी, यासाठी वाहन प्रतिबंधक आदेश पारीत करण्यात आले आहेत.
श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिम द्वार, मंदीर परीसर, पुढे महाद्वार चौक परीसरात दुचाकी, चारचाकी व इतर सर्व वाहने चालवण्यास व लावण्यास (पार्कीग) मनाई करण्यात आली आहे. या बरोबरच मंदीर परीसरातील छोटया छोटया अरूंद रस्त्यावर वाहने लावण्यास (पार्कीग) मनाई करण्यात आली.
या कालावधीमध्ये येणा-या भाविकांच्या वाहनाची पार्कीग व्यवस्था पंढरपूर नगर परीषदेमार्फत करणेत यावी. मंदीर परीसरात राहणारे, कामकाज करणारे व्यक्तींकरीता नमुद कालावधीसाठी पोलीस प्रशासनाकडून पास घ्यावेत. पासधारक व्यक्तींना त्यांचे वैयक्तीक कारणासाठी मुभा राहणार नाही, वाहन पास धारकांनी ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पाकींग करावे. मंदीर परिसरात व्यवसाय करणारे व्यावसायिकांच्या मालाची ने-आण करणेसाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन भाविकांची गैरसोय होणार नाही, अशी ठराविक वेळ निश्चीत करुन त्यादरम्यान वाहतूक होईल, याची दक्षता घ्यावी.
महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तींसाठी तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समीतीने श्रीकृष्ण मंदीर, चौफाळयापासून ने-आण करणेकामी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
——————–
कारवाई केलेल्या वाहनांची माहिती तहसीलदारांना द्यावी
आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणेचे दृष्टीने वाहन प्रतिबंध क्षेत्रामध्ये अनाधिकृतपणे वावरणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई करुन सदर वाहने पोलीस स्टेशन पंढरपूर येथे दंडात्मक कारवाईसाठी जमा करण्यात यावी. तसेच सदर वाहनावर मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदीनुसार मोठ्या रक्कमेचा दंडात्मक कारवाई अनुसरण्यात यावी. सदर रक्कम वाहनधारकांकडून रोखीने वसुल करण्यात यावी. दंडात्मक कारवाईची संपूर्ण रक्कम वसूल झाल्याशिवाय सदरील वाहन कार्यमुक्त करण्यात येवू नये, दंडात्मक रक्कमेची वसूली केलेल्या वाहनांची माहिती (अहवाल) तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी पंढरपूर यांचेकडे दर सोमवारी सादर करण्यात यावा.
——————-
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियमव्दारे कारवाई
या आदेशाचे उल्लंघन झालेस उल्लंघन करणारे विरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये कारवाईस पात्र राहिल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
——————-
पास प्राप्त झाले नंतर यांना आदेशातून सुट
शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदीर परीसरात राहणारे, मंदीरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनांसाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त झाले नंतर सदरच्या आदेशातून सूट राहील. तथापि, शासकीय कर्तव्य, मंदीरातील कर्तव्य याशिवाय इतर बाबीसाठी शासकीय व मंदीर समितीचे वाहन, कर्मचारी वाहन याचा वापर केला जाणार नाही, अन्यथा कडक कारवाई केली जाईल.


















