सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक पथकाने आज सलग दुसऱ्या दिवशी बाळीवेस, कस्तुरबा मंडई, बारा इमाम चौक परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई केली. येथील कस्तुरबा मंडई समोर, स्टेट बँक ऑफ इंडिया, जैन गुरुकुल हायस्कूल समोरील रोडवरील अतिक्रमित 12 खोके जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशित करण्यात आले
तर चार चाकी हात गाड्या जप्त करण्यात आल्या.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून पथकाने ही कारवाई केली. सलग दुसऱ्या दिवशी बाळीवेस परिसरातील कस्तुरबा मार्केट, लिंगशेट्टी मंगल कार्यालय परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. कस्तुरबा मंडई, स्टेट बँक ऑफ इंडिया या परिसरात केलेल्या कारवाईत 12 खोके जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशित करण्यात आले. चार चार चाकी हातगाड्या जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेले 10 छत पत्रे काढण्यात आले.
बारा इमाम चौक परिसरातही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी एक खोका निष्काशित करण्यात आला. तसेच इतर साहित्य जप्त केले.
दरम्यान, कस्तुरबा मंडई समोरील रस्त्याच्या कडेला आम्ही व्यवसाय करतो. सोलापूर महानगरपालिकेची पावती करतो. दोन वर्ष झालं आम्ही पैसे भरतो. आम्हाला आधी अतिक्रमण काढा असं काही सांगितलं नाही. येऊन सरळ जेसीबी लावलेत. आज आमचे सगळं नुकसान झाले. सगळे पत्रे पाडले. आमचे सगळ सामान पत्र्याखाली सापडले. पन्नास ते साठ वर्ष झाले आम्ही गुळ, नारळ, हार, उदबत्ती, फळ विकून घरचा गाडा हाकतो. आता आमचा सगळा माल खराब झाला. याचं नुकसान कोण भरून देणार असा सवाल येथील वयोवृद्ध व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.
अतिक्रमण विरोधी कारवाई सुरूच
राहणार : जगन्नाथ बनसोडे
शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक रस्ते मोकळे करण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.
विरोधाला न जुमानता केली कारवाई
कस्तुरबा मंडई समोरील कारवाई वेळी काहीजणांनी विरोध केला मात्र अतिक्रमण करणाऱ्यांना अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी अडथळा केल्यास कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर विरोध शांत झाला. पोलीस बंदोबस्तात अखेर ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

















