दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केलीय. याप्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले की, केजरीवाल आपल्या कर्माची फळे भोगत आहेत. कधीकाळी आपल्यासह ते दारूबंदीच्या विरोधात होता. तर आता मद्य धोरण बनवू लागल्याची खंत हजारे यांनी व्यक्त केली.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर राळेगण सिद्धि येथून जारी केलेल्या निवेदनात हजारे म्हणाले की, ‘मला अत्यंत दुःख झाले आहे की, अरविंद केजरीवाल सारखा माणूस, जो माझ्यासोबत काम करत होता, आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला होता, तो आज मद्य धोरण बनवत आहे. याचे मला वाईट वाटले. पण करेल काय ? सत्ते समोर काही चालत नाही. अखेर त्यांना जी अटक कण्यात आलीय ती त्यांच्या कृती मुळे झाली. आम्ही हे बोललो नसतो तर अटकेचा प्रश्नच नव्हता. जे झाले आहे, ते कायदेशीर पणे, जे व्हायचे ते होईल. ते सरकार बघेल. विचार करेल.’ असे अण्णांनी आपल्या निवेदनात नमूद केलेय. यासोबतच केजरीवाल यांचे जुने सहकारी कुमार विश्वास यांनी ट्विटरवर (एक्स) रामचरित मानस मधील, “कर्म प्रधान विश्व रचि राखा।
जो जस करहि सो तस फल चाखा॥” ओवी पोस्ट केल्या आहेत. या चौपाईच्या माध्यममाने गोस्वामी तुलसीदास कर्माचे महत्व विशद करतात. “हे विश्व कर्म प्रधान आहे, जी व्यक्ती जसे करते, तिला तसे फळ मिळते.” असा या चौपाईचा अर्थ आहे. या ओळींच्या माध्यमाने कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून टोला लगावला आहे.