जेऊर – जातेगाव,ता. करमाळा केतकी शिंदे हिने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (सी.ए.) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. मे २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ती पुणे केंद्रावरून या परीक्षेला सामोरी गेली होती.
सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जातेगाव ग्रामस्थांच्या वतीने कुमारी केतकी हिम्मतराव शिंदे हिचा जाहिर नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुजित तात्या बागल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील उपस्थित होते. सीए झाल्याबद्दल केतकी शिंदे हिची भव्य दिव्य अशा प्रकारची मिरवणूक ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आली.
करमाळा तालुक्याच्या वतीने यशकल्याणी संस्थेकडून तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिला विशेष स्मृतीचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
केतकीचे प्राथमिक शिक्षण जातेगाव येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण गरवारे कॉलेज पुणे येथे झाले.
केतकीने जिद्द आणि अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर हे कौतुकास्पद यश मिळविले आहे.
सी.ए. परीक्षा उत्तीर्ण होणारी केतकी जातेगाव गावातील पहिलीच मुलगी आहे. तिचे वडील हिम्मतराव शिंदे उद्योगपती आहेत, तर आई शैलजा गृहिणी आहे. केतकीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुढे जाऊन ‘सी.ए.’ होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. मुळातच अभ्यासात हुशार असल्याने सी ए सारखी खडतर परीक्षा असूनही तिची पूर्व तयारी आणि श्रम पाहता तिच्या यशाबद्दल आम्हाला निश्चित खात्री होती, असा विश्वास व्यक्त करणारे आईवडील आणि भाऊ बहिण केतकीच्या या यशाने अक्षरशः भारावून गेले आहेत. सद्या शिंदे कुटुंबीय पुणे येथे वास्तव्यास आहेत.
सदर कार्यक्रमासाठी जातेगावच्या पोलीस पाटील स्मिता शिंदे, जातेगाव मधील सर्व नागरिक विद्यार्थी आणि महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. सदर व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील शिंदे अध्यक्षतंटामुक्त गाव समिती जातेगाव, प्रविण शिंदे गुरुजी, हा आशिष शिंदे, महादेव शिंदे गुरुजी,तुषार शिंदे, अशोक शिंदे यांनी परिश्रम घेतले. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार महादेव शिंदे गुरुजी यांनी मानले.
डोळ्यातील स्वप्न,जिद्द,अभ्यासातील सचोटीने मला हे यश मिळालं, मी सीए व्हावं हे आई-वडिलांचं स्वप्न होतं. तेचं माझं पुढे ध्येय बनलं. त्यासाठी कॉलेजची निवड महत्वाची होती. आर्टिकल कालावधीनंतर दररोज १० ते १२ तास अभ्यास आणि कोचिंग क्लासमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आईवडीलांची साथ यामुळे यश मिळवू शकले. ग्रामीण भागातील, मुलांनी करिअरसाठी या क्षेत्रात उतरायला हवे, त्यासाठी त्यांना मी लागेल ती मदत करेल.
– कु. केतकी शैलजा हिम्मतराव शिंदे (यशस्वी सीए परिक्षार्थी)


























