तभा फ्लॅश न्यूज : “शेती करणे म्हणजे जुगार खेळणे” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरताना दिसून येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या (rain) काही दिवसांत झालेल्या पावसावर नजर ठेवून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने मूग, उडीद, सोयाबीन, मका, तूर या पिकांची पेरणी केली. मात्र आता पावसाने (rain) अचानक दांडी मारल्याने आणि उघडीप दिल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
मे-जून महिन्यात सलग पावसामुळे (rain) शेतकऱ्यांना उन्हाळी मशागतीची कामे नीट करता आली नाहीत. यामुळे शेतात गवताचे प्रमाण वाढले. परिणामी शेतकऱ्यांना रोटर चालवून जमिनीत गवत गाडून पेरणी करावी लागली. हे करताना जमिनीची वरची माती हलकी झाली आणि हवा खेळती झाली. अशा परिस्थितीत आता पाऊस न पडल्याने विशेषतः सोयाबीनसारख्या पिकांना पाण्याची तीव्र गरज भासू लागली आहे.(rain)
सध्या बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.(rain) पण अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पिके उगवून वाढायला अडचणी येत आहेत. काही भागांत तर दुसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ येईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आता पाऊस लवकर न पडल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.
सोलापूर जिल्ह्याची “रब्बीचा जिल्हा” अशी ओळख जुनी आहे. तरीही गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीपाची पिके घेण्याकडे कल वाढला आहे. पण मागील तीन वर्षे जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाली आहे. परिणामी शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. यंदाही खरीप हंगामात सुरुवातीला दिलासा देणारा पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता उंचावली आहे.
सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज : हवामान खाते
हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनीही धाडस करून खरीप हंगामासाठी तयारी केली. मात्र, तो अंदाज फोल ठरल्याने शेतकऱ्यांच्या मनात निराशा पसरली आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “सुरुवातीला झालेल्या पावसावरच पेरणी केली. आता पाऊसच नाही. जमिनी कोरड्या पडत आहेत. दुसऱ्यांदा पेरणीची वेळ येईल की काय, याची भीती वाटते.”
पावसाचा लहरीपणा, मशागतीची अडचण, गवताचा सापळा आणि आता पाण्याची टंचाई – या साऱ्या समस्यांमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. तो देवाला नवस साकडे घालत आहे. “चातकाप्रमाणे” आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे.
शासनाने हवामान खात्याच्या अंदाजावर विसंबून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे, नुकसान झाल्यास तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देणे, व जलसिंचनाच्या योजना तातडीने कार्यान्वित करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा दुष्काळी बार्शी तालुक्यातील बळीराजाची अवस्था आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.