आई आणि मुलाचा आज २ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. यासाठी ५ किलोच्या केकची ऑर्डर आईने दिली होती. नातेवाईकांना वाढदिवसांसाठी बोलवताना ती प्रचंड आनंदात होती.
कर्जबाजारी दीपक गायकवाड पत्नीसह आपल्या चिमूरड्या आदिराजची हत्या करून फरार झाला होता. या आरोपीला पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक केली आहे. आदिराज आणि अश्विनी यांच्या वाढदिवसाच्या काही तास आधीच त्यांची हत्या झाल्याने नातेवाइकांनी आक्रोश केला. त्याने हत्या का व कशी केली? याचा खुलासा तपासात उघड होणार आहे. मात्र, त्याच्या या कृत्यानंतर त्याच्या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती.
उच्चभ्रू आयुष्य जगण्याच्या जिद्दीने पेटलेल्या दीपक याने कल्याण शहरात मध्यवर्ती भागात निधी रिसर्च फर्म फायनाशियल कन्सल्टट कंपनी थाटली होती. गुंतवणूकदारांना ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत करोडो रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. सुरुवातीला गुंतवणूकदारांना चांगला परतावा त्याने दिला. मात्र, त्यानंतर त्याचा व्यवसाय बुडीत निघाल्याने गुतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावला होता. कल्याणात खेळण्याची चार ते पाच दुकाने थाटून बसलेल्या दीपककडे १०० कामगार काम करत होते. मात्र मागील चार ते पाच महिन्यापासून या कामगारांना त्याने पगार दिला नव्हता.
कर्जबाजारी झालेल्या दीपक याने शुक्रवारी १ डिसेंबर रोजी टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि मुलाच्या जेवणात विष घातले. यात चिमूरड्याने दम तोडला तर पत्नी अत्यवस्थ झाली पण निर्दयी दीपक याने उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली. तर ७ वर्षांच्या चिमुकल्या आदिराजने त्या आधीच जगाचा निरोप घेतला होता. पत्नी मुलाचा जीव घेतल्यानंतर दीपक याने पंख्याला साडी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हा नाद सोडला आणि तो पळून गेला. आपल्या चारचाकी गाडीने संभाजीनगरच्या दिशेने जाताना त्याने आपल्या भावाला आणि त्यानंतर पत्नीच्या भावाला फोन करून आपण हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी मोबाइलच्या लोकेशनवरून त्याचा पाठलाग करत त्याला संभाजीनगरमधून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने हत्या का व कशी केली? याचा उलगडा होऊ शकेल असे पोलिसांनी सांगितले.
मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
जोपर्यंत आरोपीला अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे आव्हान होते.
५ किलोच्या केकची ऑर्डर
आई आणि मुलाचा आज २ डिसेंबर रोजी वाढदिवस होता. यासाठी ५ किलोच्या केकची ऑर्डर आईने दिली होती. नातेवाईकांना वाढदिवसांसाठी बोलवताना ती प्रचंड आनंदात होती. मात्र, वाढदिवसाचा केक आणण्यापूर्वीच तीने मुलासह जगाचा निरोप घेतला. आई मुलाचा जन्मदिवस आणि शेवटचा दिवस एकच ठरल्याने नातेवाइकाच्या दु:खाला पारावार उरला नव्हता.