तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट तालुक्यातील दिग्रस गावाचा सुपुत्र आणि ग्रामपंचायत दिग्रसचे उपसरपंच कर्तार साबळे यांनी संसद भवन, नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन किनवट तालुक्याचा व लबाना समाजाचा मान उंचावला आहे.
लबाना समाजातील हा तरुण कार्यकर्ता आपल्या कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिक स्वभावामुळे अल्पावधीतच दिल्लीच्या राजकारणात लोकप्रिय झाला आहे. तत्कालीन खासदार आ. हेमंत पाटील यांच्या सहवासातून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करताना त्यांनी राजकारण जवळून पाहिले. नंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात संधी मिळाल्यानंतर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी त्यांच्या कार्यकौशल्याची दखल घेऊन त्यांना स्वीय सहाय्यक म्हणून नेमणूक दिली. ज्ञान चातुर्य, नम्र स्वभाव आणि लोकांशी सहज सलगी करण्याची कला यामुळे कर्तार साबळे यांचे अनेक खासदार व केंद्रीय मंत्र्यांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत.
हा दिवस त्यांच्या आयुष्यात ऐतिहासिक ठरला. याच दिवशी त्यांना संसद भवनात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीदरम्यान कर्तार साबळे यांनी पंतप्रधानांना किनवट तालुक्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, आदिवासी व बंजारा समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन, तसेच लबाना समाजाचे योगदान याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांना किनवट तालुक्याला भेट देण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवले.
या अभिमानास्पद भेटीबद्दल कर्तार साबळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आ. भीमरावजी केराम, आ. बोंढारकर, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे, बाजार समिती सभापती गजानन पाटील मुंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, बाजार समितीचे संचालक प्रेमसिंग साबळे, भाजपा नेते अजित साबळे, मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनिवार, उद्योजक मनोज तिरमनवार, माजी नगरसेवक शिवाजी आंधळे, आ. हेमंत पाटील यांचे संपर्क प्रमुख सुनील पाटील तसेच पत्रकार मधुकर अन्नेलवार, अरुण तम्मडवार, कचरू जोशी, यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
छोट्याशा गावात उगवलेला हा तरुण आज दिल्लीच्या राजकारणात ठसा उमटवत असून, त्याने घेतलेली पंतप्रधानांची भेट किनवट तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.