बार्शी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी बार्शी तालुका कार्याध्यक्ष पदावर किशोर मांजरे यांची नियुक्ती केली आहे.
या नियुक्ती पत्रात राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार, नव्याने नियुक्त झालेल्या कार्याध्यक्षांनी आगामी काळात पक्ष वाढीसाठी भरीव काम करावे, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील मौजे देवगाव येथील शेतकरी कुटुंबातील किशोर मांजरे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या चळवळीच्या माध्यमातून समाजासोबत जोडलेले असतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच विविध वंचित घटकातील जनतेला हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी मांजरे यांचा नेहमीच पुढाकार असतो. गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी किशोर मांजरे यांचे आजपर्यंतचे योगदान मोलाचे ठरले आहे.
आगामी काळात उपळाई (ठों.) गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी किशोर मांजरे यांची उमेदवारी निश्चित होण्याचे संकेत मिळत आहेत. विविध घटकातील समाजासाठी सातत्याने लढत असणाऱ्या शेतकरी पुत्राला पंचायत समितीच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील विकासात्मक कायापालट होईल असा आशावाद बार्शी उत्तर भागातील शेतकरी व युवकांमधून उमठत आहे.
सोलापूर जिल्ह्यात पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, नवनियुक्त किशोर मांजरे यांचे बार्शी तालुक्यातून अभिनंदन होत आहे.


















