सोलापूर – “२०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारत सज्ज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, ऑलिम्पिकमध्ये ‘कबड्डी’ या अस्सल भारतीय खेळाचा समावेश व्हावा, यासाठी क्रीडा भारती विशेष प्रयत्न करत आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० कबड्डी संघ तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे प्रतिपादन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री प्रसाद महानकर यांनी केले.
सोलापूर येथे आयोजित क्रीडा भारतीच्या प्रशिक्षक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. क्रीडा भारतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी महानकर सध्या देशव्यापी दौरा करत आहेत.
’खेळ संवाद’ उपक्रमाचा संकल्प
यावेळी बोलताना महानकर पुढे म्हणाले की, “केवळ मैदानी खेळच नव्हे, तर खेळाडूंच्या मानसिक आणि वैचारिक विकासासाठी यावर्षी भारतातील १०० मोठ्या गावांमध्ये ‘खेळ संवाद’ या उपक्रमाद्वारे चर्चासत्रांचे आयोजन करण्याचा संकल्प क्रीडा भारतीने केला आहे.”
या बैठकीला क्रीडा भारतीचे शहराध्यक्ष सुधीर देव, शहर सहमंत्री प्रतीक तडवळकर, प्रमोद चुंगे, अनिल गिराम, भक्तराज जाधव, युवराज शिंदे, केशव गुंटूक, विवेक मिस्किन यांसह अनेक प्रशिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा भारतीचे उपाध्यक्ष अरुण उपाध्ये यांच्या प्रास्ताविकाने झाली. जिल्हा मंत्री राजेश कळमणकर यांनी क्रीडा भारतीच्या कार्याचा वार्षिक अहवाल सादर केला. पश्चिम महाराष्ट्र प्रांतमंत्री ज्ञानेश्वर मॅकल यांनी उपस्थितांचे आभार मानले.



























