परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत परभणी जिल्ह्यातील बोरी (ता. जिंतूर) येथे नवीन नेतृत्वाची निवड जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना नेते अंबादास दानवे व उपनेते खा. संजय (बंडू) जाधव यांच्या सूचनेनुसार कृष्णा निवृत्तीराव राऊत यांची बोरी तालुका प्रमुख (प्रभारी) म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी या नियुक्तीपत्रावर जिल्हाप्रमुख रविंद्र रामकिशन धर्मे यांच्या सहीने आदेश जाहीर झाला.
नवीन नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मोठी चालना मिळणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार तळागाळात करण्याची जबाबदारी कृष्णा राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बोरी तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी काळात पक्षवाढीसाठी ते सक्रीय पुढाकार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीमुळे स्थानिक नेतृत्वाला नवीन ऊर्जा मिळाली असून राऊत यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी दिलेल्या अभिनंदनपर संदेशात, “कार्यकर्त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत आपण पक्षवाढीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्याल,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नव्या जबाबदारीसाठी राऊत यांना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा मिळत असून आगामी राजकीय वाटचालीत त्यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
























