कंगना रणावतला मारली होती चापट
नवी दिल्ली, 03 जुलै (हिं.स.) : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिला चंदीगड विमानतळावर चापट मारणारी सीआयएसएफची कॉन्स्टेबल कुलविंदर कौर आणि तिच्या पतीची कर्नाटकच्या बंगळुरू येथे बदली करण्यात आलीय.
लोकसभा निवडणूक निकालानंतर हिमाचल प्रदेशातून दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर गेलेल्या कंगना राणावत हिला सुरक्षा तपासणी दरम्यान सीआयएसएफची कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने चापट मारली होती. या घटनेनंतर महिलेचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तिने चापट मारल्याचे कारण सांगितले होते. “कंगनाने शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी 100 रुपये घेऊन आंदोलन करत असल्याचे वक्तव्य केले होते.
त्यावेळी माझी आई त्या आंदोलनात सहभागी झाली होती,” असे त्या महिलेने म्हटले होते. कंगनाने या घटनेची तक्रार सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर कुलविंदर कौर हिला निलंबित करण्यात आले होते. कुलविंदर हिचा भाऊ राजकारणात असून तो पंजाबमध्ये शेतकरी संघटना चालवतो. तर तिचा पती देखील सीआयएसएफमध्येच कार्यरत आहे. या घटनेला सुमारे एक महिना उलटून गेल्यानंतर आता कुलविंदर आणि तिच्या नवऱ्याची बंगळुरू येथे बदली करण्यात आलीय.