सोलापूर : तिरुपती येथील पद्मावतीदेवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून ‘पुट्टींटी पट्टूचिरा’ अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत. यानिमित्ताने पद्मावतीदेवीची शुक्रवारी लोटस मंगल कार्यालयात सामूहिक कुंकूमार्चना करण्यात आली. यानंतर शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या माहेरच्या साडीच्या दर्शनाची सोय दाजी पेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात करण्यात येणार आहे.
पद्मशाली श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदा 21 नोव्हेंबर रोजी तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवीला ब्रह्मोत्सवनिमित्त माहेरची साडी अर्पण करण्यात येणार आहे. याचे यजमानपद अनेक जोडप्यांनी घेतले आहे. दरम्यान ज्या भाविकांना तिरुपती येथील ब्रह्मोत्सवात सहभागी होता येत नाही
अशांच्या सामूहिक देणगीतून देवीला एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे. या साडीची पूजा शुक्रवारी लोटस मंगल कार्यालयात करण्यात आली. यानिमित्त पद्मावतीदेवीची सामूहिक कुंकूमार्चना करण्यात आली. पंडित वेणुगोपाल जिल्ला, पंडित सुदर्शन जिल्ला यांच्या पौरोहित्याखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी, अध्यक्ष अंबादास बिंगी, अखिल भारतीय पद्मशाली संघाचे तुकेश भैरी, नागेश सरगम, गोपी वड्डेपल्ली, व्यंकटेश पडाल, पुरुषोत्तम पोबत्ती, दामोदर पासकंटी, तुषार जक्का आदी तसेच महिला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कल्याण व्यंकटदास भजनी मंडळाचे गायक बाळू मदनाल, गायिका इंदिरा गड्डम, गीता सग्गम, चंदू लिबोळे, नारायण रुमाल, श्रीनिवास बोगा यांनी भक्तीगीते सादर केली. भक्तांनी व्यंकटरमणा गोविंदा… गोविंदा… चा जयघोष केला. अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान समाजबांधवांच्या सामूहिक देणगीतून देवीला अर्पण करण्यात येणारी माहेरच्या साडीचे शनिवार दिनांक 15 नोव्हेंबरपासून दाजी पेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी या साडीसाठी देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरपर्यंत भक्तांना या साडीचे दर्शन घेता येईल.या ठिकाणी भक्तांनी यथाशक्ती देणगी अर्पण करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
——————————–
सोलापूर : लोटस मंगल कार्यालयात पद्मावतीदेवीची सामूहिक कुंकूमार्चना करण्यात आली. यामध्ये सहभागी झालेले भक्तगण.


















