कुर्डुवाडी – कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा पाच प्रमुख पॅनल रिंगणात उतरल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी (शरद पवार गट) युती, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असे हे पाच पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मागील निवडणुकांच्या तुलनेत या वेळचा राजकीय कल अधिक बहुरंगी आणि अनिश्चित दिसत असून, मुख्य चुरस राष्ट्रवादी (अ.प.) आणि शिवसेना (उबाठा) व शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
#उमेदवारीत पेच आणि नाराजीची छाया
# निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख पक्षांना उमेदवारी जाहीर करण्यात मोठा पेच निर्माण झाला होता. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये तिढा निर्माण झाल्याने तिकिटवाटप उशीर झाला, ज्याचा परिणाम अंतर्गत नाराजीत झाला आहे. काही नाराज इच्छुकांनी विरोधी पॅनल गाठल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदाचा लढा फक्त पक्षनिहाय मर्यादित न राहता व्यक्तीनिष्ठ आणि गटाधारित बनला आहे.
#नवीन चेहरे, नव्या समीकरणांची निर्मिती#
मागील पंचवार्षिक काळात झालेल्या कामगिरीवरील टीका आणि जनतेची नाराजी लक्षात घेत प्रमुख पक्षांनी या वेळेस नवीन चेहरे पुढे आणले आहेत. अनुभवी कार्यकर्त्यांसोबत तरुण नेतृत्वालाही संधी देत “नवेपर्व ”चा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे मतदारांमध्ये नव्या चेहऱ्यांविषयी उत्सुकता निर्माण झाली असून मतदानावर त्याचा परिणाम दिसू शकतो.
#बहुरंगी लढतीचा थरार#
पूर्वी तीन पक्षांपुरती मर्यादित असलेली नगरपालिका निवडणूक या वेळी पाच पॅनलांपर्यंत विस्तारली आहे. नव्या युती आणि स्वतंत्र गटांच्या सहभागामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम निकालावर कोणत्या पक्षाचे “राजकीय गणित” मात करते, हे पाहणे खरोखरच उत्सुकतेचे ठरणार आहे.
#मतदारांचा कल ठरवणार समीकरण# कुर्डुवाडी शहरातील आगामी पाच वर्षांच्या विकासमार्गाचा निर्णय या निवडणुकीतूनच ठरणार आहे. बेरोजगारी,पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि आरोग्यसेवा या स्थानिक प्रश्नांवर जनतेचा कल कोणत्या दिशेने झुकेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


















