सोलापूर : शहरातील रामलाल चौकातील एल. व्ही. कॉम्प्लेक्ससमोरील नुकताच बांधण्यात आलेला फुटपाथ अवघ्या काही दिवसांतच उखडल्याने त्याची दुरावस्था झाली आहे. या फुटपाथवरील पेवर ब्लॉक्स अनेक ठिकाणी तुटलेले व विस्कटलेले दिसून येत आहेत. नव्यानेच करण्यात आलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
फुटपाथ उखडल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्डे पडल्याने दुखापत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रहदारीच्या वर्दळीच्या ठिकाणी अशी अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांचा खर्च करून केलेले काम इतक्या लवकर खराब कसे झाले, असा सवाल उपस्थित होत आहे.
फुटपाथ दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दुरुस्ती न झाल्यास समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
















