तभा फ्लॅश न्युज / मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठा बदल घडवणारा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध इस्लामपूर शहराचं नाव आता ‘ईश्वरपूर’ असेल. राज्य मंत्रिमंडळाने यास अधिकृत मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, त्याच पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. इस्लामपूरच्या नामांतराचा प्रस्ताव गेल्या काही काळापासून प्रलंबित होता. स्थानिक जनतेतून आणि काही राजकीय गटांकडून यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती. अखेर आज या मागणीवर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलं आहे.
भुजबळ म्हणाले की, “राज्य सरकारने ‘इस्लामपूर’चं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार असून, त्यांच्या मंजुरीनंतर नव्या नावाची अंमलबजावणी होईल.”
नामांतराच्या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, काही विरोधक याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चाही रंगू लागली आहे. मात्र राज्य सरकारने हा निर्णय स्थानिक जनतेच्या भावना आणि मागणीनुसार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील राजकारणातही नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘ईश्वरपूर’ हे नाव आता अधिकृत कागदपत्रांमध्ये कधीपासून वापरात येईल, हे केंद्र सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.