तभा फ्लॅश न्यूज/ भोकरदन : भोकरदन तालुक्यातील जोमाळा येथील स्व. ॲड. भाऊसाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश नामदेव कोलते याने उल्लेखनीय यश मिळवले आहे. क्षीरसागर येथील शेतकरी कुटुंबातील आकाश हा बी.ए. द्वितीय वर्षात शिक्षण घेत असताना केंद्र सरकारच्या इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (ITBP) दलात सैनिकपदी निवडला गेला आहे.
सध्या आकाश तामिळनाडू राज्यातील शिवगंगा येथे सैनिक प्रशिक्षण घेत आहे. कठोर मेहनत, चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर आकाशने आपल्या कुटुंबाचे तसेच गावाचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशाबद्दल जनविकास शिक्षण संस्था संचलित स्व. ॲड. भाऊसाहेब देशमुख महाविद्यालयाच्या वतीने आकाशचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेचे राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना राजाभाऊ देशमुख म्हणाले, “आकाश कोलते याने दाखवलेली मेहनत, जिद्द आणि देशसेवेची तयारी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील युवकांनी अशा संधींचा लाभ घ्यावा.”
महाविद्यालयाच्या प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही आकाशच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही निवड एक आदर्श ठरू शकते. आई-वडिलांची शेतीकामे, आर्थिक आव्हाने आणि शिक्षणातील अडचणी पार करत आकाशने देशसेवेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यामुळे तालुक्यातून आणि जिल्ह्यातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.