सोलापूर – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनिक कामकाजाला वेग देत विभागनिहाय आढावा बैठकींचा धडाका लावला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या एकूण सोळा विभागांचा दोन दिवसांचा सविस्तर आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याअंतर्गत बुधवारी पहिल्या टप्प्यात मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत सकाळच्या सत्रात सामान्य प्रशासन, महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद अभियान तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान संबंधित विभागांतील विविध योजनांची अंमलबजावणी, निधी वितरण, प्रलंबित कामे आणि गुणवत्तेचे निकष यांचा तपशीलवार ऊहापोह करण्यात आला. विशेषतः महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत बचत गटांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांची भूमिका अधिक परिणामकारक कशी होईल, याबाबत सूचना देण्यात आल्या.
कुपोषण निर्मूलन हा महत्त्वाचा मुद्दा ठळकपणे चर्चिला गेला. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेवा, पोषण आहार वितरण आणि आरोग्य तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. लघु पाटबंधारे विभागाच्या आढाव्यात बंधाऱ्यांच्या उभारणीबाबत विशेष चर्चा झाली. जलसंधारण आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अशा प्रकल्पांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. याशिवाय बांधकाम विभागाच्या कामकाजात गुणवत्ता, वेळेत पूर्णता आणि पारदर्शकता यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रभेटींचाही धडाका लावला आहे. त्यांनी जिल्हा परिषद शाळा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन सेवा सुविधांची पाहणी केली आहे. या पाहण्यांमधून स्थानिक पातळीवरील अडचणी आणि त्रुटी समजून घेत त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते.
तथापि, या घाईगडबडीने घेतल्या जाणाऱ्या बैठकींबाबत काही राजकीय व प्रशासकीय वर्तुळात प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहे. येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. त्यानंतर संबंधित विभागांचे अधिकार व जबाबदाऱ्या सभापतींमध्ये वाटप होणार आहेत. अशा परिस्थितीत, सभापतींची नियुक्ती होण्यापूर्वीच सर्व विभागांचा आढावा घेण्याची घाई का केली जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासनिक दृष्टिकोनातून पाहता, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी सर्व विभागांची प्राथमिक माहिती आत्मसात करून पुढील धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी तयारी सुरू केली असल्याचेही या कृतीतून दिसून येते. अध्यक्षांकडे लघु पाटबंधारे, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता आणि ग्रामीण पाणीपुरवठा हे विभाग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर उपाध्यक्षांना अर्थ व बांधकाम समितीची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, नव्या नेतृत्वाने सुरुवातीपासूनच प्रशासनावर मजबूत पकड निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, या आढावा बैठकींमधून विकासकामांना गती देण्याचा हेतू स्पष्ट होत आहे. मात्र, या प्रक्रियेत विषय समित्यांच्या भूमिकेचा समतोल राखला जाईल का, हे पाहणे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
जिल्हा परिषदेत आज ‘मेगा रिव्ह्यू’; अध्यक्ष-उपाध्यक्ष घेणार उर्वरित विभागांचा आढावा!
जिल्हा परिषद सोलापूरमध्ये नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. ही महत्त्वपूर्ण बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनात पार पडणार असून, प्रशासनातील कामकाजाला गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक निर्णायक मानली जात आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले असून, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता, अर्थ, शिक्षण (प्राथमिक व माध्यमिक), आरोग्य तसेच ग्रामीण पाणी पुरवठा या प्रमुख विभागांना त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या बैठकीत प्रत्येक विभागाने आपल्या कामकाजाची अद्ययावत माहिती सादर करणे अनिवार्य असून, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनातील प्रलंबित कामे, अडचणी आणि प्रगतीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे.प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे, प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि विकासकामांना गती देणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सर्व विभागांच्या कामगिरीवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत विभाग — सकाळी १०.०० ते ११.००
पाणी व स्वच्छता विभाग — सकाळी ११.०० ते १२.००
अर्थ विभाग — दुपारी १२.०० ते १.००
शिक्षण (प्राथमिक) — दुपारी १.०० ते २.००
शिक्षण (माध्यमिक व योजना) — दुपारी २.३० ते ३.३०
आरोग्य विभाग — दुपारी ३.३० ते ४.३०
ग्रामीण पाणी पुरवठा — सायं. ४.३० ते ५.३०






















