सोलापूर : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय एक दिवसीय ‘लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह’ या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. प्रमुख वक्ते म्हणून डीक परास्सिनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुक्त प्रश्नोत्तर पद्धतीने झालेल्या या सत्रांत शिक्षण, करिअर, आत्मविश्वास, ताणतणाव, नातेसंबंध आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर डीक परास्सिनी यांनी सोप्या शब्दांत सकारात्मक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करत जीवनात नकारात्मकतेला स्थान न देण्याचा संदेश दिला.
देशातील विविध नामांकित शैक्षणिक संस्था व शासकीय यंत्रणांमध्ये मार्गदर्शन केलेल्या परास्सिनी यांनी ‘लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह’ या सामाजिक उपक्रमातून आजवर हजारो लोकांपर्यंत सकारात्मक विचार पोहोचवला आहे. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सत्रामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. वक्त्यांनी समर्पक उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.
डीक परास्सिनी यांनी यापूर्वी देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्था, वैद्यकीय विद्यापीठे तसेच राष्ट्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणांमध्ये मार्गदर्शन केले आहे. ‘लाइफ इज ऑल पॉझिटिव्ह’ या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आजवर ६३ हजारांहून अधिक लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकला असून १५ हजारांहून अधिक अन्नसेवा आणि १२ हजारांहून अधिक वृक्षारोपण उपक्रम राबवले आहेत.
या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरवर लक्ष केंद्रित करणे, पालकांचा सन्मान राखणे, समाजासाठी काहीतरी परत देणे आणि स्वतःला सतत प्रेरित ठेवणे याबाबत मोलाचा संदेश दिला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. के. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. एस. डी. नवले यांनी केले.


























