सोलापूर : बसपा हा एक आदर्श विचारधारा जोपासणारा पक्ष आहे. महाराष्ट्रातही आपण होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सर्वत्र पाय रोवले पाहिजे. महाराष्ट्रात यंदा निवडणुकीत बसपाला चांगले यश मिळेल. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी माजी खा. राजाराम यांनी सोलापुरात केले.
डी.एस.फोर, बाससेफ व ब.स.पा.चे संस्थापक कांशिराम यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युनिटच्या वतीने अभिवादन सभा व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी माजी खा. राजाराम, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनिल डोंगरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रदेश सचिव अॅड. संजीव सदाफुले, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड , शहर अध्यक्ष देवा उघडे, रशीद सरदार, टी. एन. लोहार, दीपक ताकतोडे, शिलवंत काळे, दत्तात्रय वाडेकर, प्रवीण कांबळे, सुभाष गायकवाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी माजी राज्यसभा खा. राजाराम तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.सुनिल डोंगरे यांनी महाराष्ट्रातही आपण आपल्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सर्वत्र पाय रोवले पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरूवात गायक विशाल मोरे यांच्या भिमगीत गायनाने झाली. याप्रसंगी कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.