सोलापूर – श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील खेळाडूंनी अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या चालू शैक्षणिक वर्षामधील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली येथे संपन्न झालेल्या ऍथलेटिक्स क्रीडा प्रकारात १०० मीटर आणि २०० मीटर धावणे या दोन्ही स्पर्धांमध्ये महाविद्यालयाची प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कु. श्री महांगडे हिने सुवर्णपदक प्राप्त केले. ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. पल्लवी भोसले हिने कास्यपदकाला गवसणी घातली. ४×१०० मीटर या रिले प्रकारात महाविद्यालयाच्या मुलींचा संघ सर्वसाधारण तृतीय पदाच्या विजेतेपदाचा दावेदार ठरला. यात कु. वैष्णवी जाधव, कु. खुणे अंजली, कु. कुर्डे सायली आणि कु. भोसले पल्लवी इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.
या समवेत कृषी महाविद्यालय फलटण येथे संपन्न झालेल्या ६५ किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी सुरज जवळगे याने द्वितीय स्थान प्राप्त करून रौप्य पदकाची कमाई केली. सदरील सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. संभाजी कोकाटे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले.
अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेप्रमाणेच लोकमंगल कृषी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षातील विद्यार्थी प्रतिक शिंदे याने कलाक्षेत्रात देखील विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्वल केले. त्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या संघाचे शास्त्रीय तबलावादन आणि लोकसंगीत तालवाद्य या प्रकारात प्रतिनिधित्व केले.
सदरील सर्व विद्यार्थ्यांनी गौरवास्पद कामगिरी करून महाविद्यालय तथा संस्थेचे नाव उज्वल केले याकरिता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष देशमुख, अध्यक्ष श्री. रोहन देशमुख, सचिव डॉ. अनिता ढोबळे आणि प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या. भविष्यात देखील विद्यार्थ्यांनी अशीच दैदिप्यमान कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्वल करीत राहावे असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.


















