तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मालवाडा घाट रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, हे श्रेय केंद्रातील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार भीमराव केराम यांना जाते, असे मत भारतीय जनता पक्षाचे किनवट शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील धनोडा ते पाटोदा या रस्त्यावर असलेल्या मालवाडा घाटातील रस्ता रखडलेला होता. अनेक वर्षांपासून वनविभागाच्या परवानगीअभावी हे काम थांबले होते. मात्र आमदार केराम यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि दिल्ली दरबारी प्रभावी पाठपुराव्यामुळे सर्व अडथळे दूर होऊन अखेर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.
गोपू महामुने यांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक मालवाडा घाटातील अपूर्ण रस्त्यामुळे त्रस्त होते. अर्धवट नाल्यांची कामे, अपूर्ण पथदिवे, अरुंद रस्ता आणि दुभाजक नसल्यामुळे अपघातांची मालिका सुरू होती. मात्र आमदार केराम यांनी हे प्रश्न गांभीर्याने घेतले आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे अशक्य वाटणारे काम मार्गी लावले.” ते पुढे म्हणाले, “पाच-सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. दत्तचौक ते न्यायालय परिसरात दुभाजकाचा अभाव, पेव्हरब्लॉकचा अभाव, अंधारामुळे अपघात आणि भाविकांची गैरसोय यामुळे नागरिकांमध्ये असंतोष होता. पण आज ही कामे मार्गी लागत आहेत हे आमदार केराम यांच्या कार्यशैलीचे फलित आहे.” या कामामुळे तिर्थक्षेत्र माहूर व आसपासच्या भागातील लाखो भाविक व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार असून, सुरक्षित आणि सुविधा असलेला रस्ता लवकरच साकार होईल, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
आमदार केराम यांच्या कार्यशैलीवर जनतेचा विश्वास
गेल्या ६ वर्षांच्या कार्यकाळात भीमराव केराम यांनी अनेक अशक्य व रखडलेली कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे किनवट-माहूर मतदारसंघातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.