सोलापूर – महापालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र बैठकांची सरबत्ती जागा वाटपाची डोकेदुखी शेवटच्या क्षणापर्यंत कायम होती. एकाच पक्षातील दोन अंतर्गत गटबाजीने महाविकास आघाडी खरडून निघाली.
उद्धवसेनेच्या महेश धाराशिवकर आणि अजय दासरी यांच्यातील अंतर्गत वादाचा “सारीपाट”साऱ्यांनीच डोळे उघडून बघितला, सरते शेवटी योगेश सलगर निष्ठावंत शिवसैनिकाने देखील जागा वाटपावरून भर बैठकीत आघाडीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले…! एकंदर नाट्यमय घडामोडीनंतर अखेर महाविकास आघाडीचे घोडे गंगेत न्हाले… जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला..! खरे परंतु पुढे कसे असा प्रश्न कायम आहे? कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार उभे करायचा हा’यक्ष” प्रश्न आघाडीच्या नेत्यांसमोर कायम आहे.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष काँग्रेस, उद्धवसेना, शरद राष्ट्रवादी, माकप आणि मनसे शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या हॉटेल सिटी पार्कमध्ये गेल्या आठ दिवसांपासून वाटाघाटीत मग्न होते. सकाळ दुपार संध्याकाळ अशा तीन बैठका जागा वाटपावर आणि फॉर्मुलावर झाल्या. परंतु पाच पक्षातील नेतेमंडळींचे एकमत होत नव्हते. मोठा भाऊ मीच या अविर्भावात काँग्रेसने जास्त जागा मागितल्या. त्यावरून उद्धवसेनेने देखील आपली “धगधगती मशाल” कायम ठेवली.
स्टॅंडिंग नगरसेवक कमी असल्याने तुतारीचा आवाजच येईनासा झाला. तर पूर्व भागात लालबावट्याने आपला लाल झेंडा फडकवला. यामध्येच उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाली खरी परंतु जागा कशा अन् कोणत्या घ्यायच्या ; याबाबत शिवसेना आणि मनसे यांच्यात एक मत झाले नाही.
शिवसेनेच्या कोट्यातून मनसेला जागा देण्याचे बंद खोलीत ठरले. परंतु मनसे नेत्यांना याबाबत काही कळाले नाही. म्हणून त्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. विनायक महिंद्रकर यांनी अजय दासरी यांना आमच्या पक्षाला जागा देण्याचे, खडे बोल सुनावत हॉटेल सोडले. तर त्याच ठिकाणी उद्धवसेनेचे महेश धाराशिवकर आणि अजय दासरी यांच्यात खडाजंगी सुरू झाली. सर्वप्रथम हॉटेल सिटी पार्कच्या पायऱ्यांवर सुरू झालेला हा वाद हॉटेलमधील बंद खोली समोर सुरू झाला.
आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये यासाठी धाराशिवकर यांनी आवाज वाढवला…”पैसे खाल्ल्याचा आरोप केला”…तर दुसरीकडून अजय दासरी यांनी देखील “मी बघून घेतो; जा तू पण बघून घे ” असे खडसावून सांगितले. अचानक घडलेल्या गरमागरमच्या वातावरणात प्रताप भाऊसह इतर शिवसैनिकांनी दोघांची समजत काढून शांत केले. बंद खोली बाहेर सुरू असलेला वाद खोलीच्या आतील नेत्यांना कळालच नाही. तर दुसरीकडे मनसे नेत्यांशिवाय आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी महाविकास आघाडी डिक्लेअर केली.
आघाडीच्या बैठकीत काँग्रेस ४५, उद्धवसेना ३०, शरद पवार राष्ट्रवादी २०, माकप ७ असा फार्मूला ठरवण्यात आला. त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी माजी आमदार आडम मास्तर, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शहरप्रमुख अजय दासरी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, शरद राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेश गादेकर, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, माकपचे युसुफ शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी हात उंचावून आणि विजय चिन्ह करून आघाडी झाल्याची जाहीर केले. यावेळी आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी भाजपला शह देण्यासाठी आमची आघाडी जाहीर झाली असून, लवकरच महापालिकेच्या प्रभाग निहाय उमेदवार निश्चिती करून ते जाहीर करण्यात येईल असे सांगितले.
आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो
भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी केली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. जानेवारीच्या ४ तारखेला प्रमुख नेते मंडळी प्रचारातून भाजपवर हल्लाबोल करतील. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एक पाऊल मागे घेत आघाडी केली आहे. निवडणुकीत विकासाचा मुद्दा कायम राहणार आहे.
– आडम मास्तर, माजी आमदार माकप
४ जानेवारीला प्रमुख नेते एकत्र येणार
महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सुशीलकुमार शिंदे, खा.प्रणिती शिंदे,खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत आघाडीचा मेळावा संपन्न होणार असून, त्याच दिवशी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. भाजपने गेल्या नऊ वर्षांपासून विकासापासून वंचित ठेवले. त्यांनी भ्रष्ट कारभार केला.
– चेतन नरोटे, शहराध्यक्ष काँग्रेस
इलेक्टिव्ह मेरिटवर भर देण्याचा प्रयत्न झाला.
भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडी करण्यात आली आहे. सर्वांनी दोन पावले मागे घेऊन जागांची वाटाघाटी केल्या आहेत. इलेक्टिव्ह मेरिटवर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
– महेश गादेकर, शहराध्यक्ष शरद राष्ट्रवादी
भाजप विरोधी आघाडी.
सर्व पक्षांनी एकत्रित येऊन भाजपला शह देणार आहे. शहराच्या विकासाठी आम्ही तसेच ईतर पक्षांनी त्याग केला आहे. आघाडीतून भाजपचा पराभव करणार. नवीन तंत्र घेऊन शहराचा विकास करू.
अजय दासरी, शहर प्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना
निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्या
महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मंडळींची बैठक सिटीपार्क हॉटेलच्या बंद खोलीत झाली. यावेळी निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होऊ नये, यासाठी मी आग्रही भूमिका मांडली. दासरी यांच्यात वादविवाद झाला. परंतु तो निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी होता.
– महेश धाराशिवकर, शहरप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना
आघाडीत उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न झाल्याने वाद झाला.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली. पहिल्या बैठकीत प्रभाग ८ मध्ये मनसेला उमेदवारी देण्यासंबंधी होकार दर्शवण्यात आला. मात्र आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला नाही. त्याच प्रमाणे शिवसेनेच्या कोट्यातून मनसेला जागा देण्यासंबंधी कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. कोणताही निर्णय घेताना आम्हाला देखील विश्वासात घ्यावे. आघाडीत आम्हाला ५ जागा देण्याविषयी सहमती दर्शवली आहे.
– विनायक महिंद्रकर, जिल्हाप्रमुख मनसे
निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्या
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष जागा वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करत आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये एक जागा मागितली आहे. परंतु आम्हाला डावलले जात आहे. नाईलाजाने चालू पत्रकार परिषदेत आम्हाला आमची गाऱ्हाणी मांडावी लागली. अन्यथा शिवसेना स्टाईलने काँग्रेसचे सीट पाडू.
– योगेश सलगर, उपविभाग प्रमुख उद्धवसेना
फोटो ओळ – महाविकास आघाडी झाल्यानंतर विजयी चिन्ह दाखवताना प्रमुख नेतेमंडळी.. दुसऱ्या छायाचित्रात उद्धवसेनेचे प्रमुख नेते महेश धाराशिवकर आणि अजय दासरी यांच्यात जागावाटपावरून झालेली बाचाबाची तर तिसऱ्या छायाचित्रात योगेश सलगर निष्ठावंत शिवसैनिकाने पत्रकार परिषदेत उमेदवारी मिळण्याची मागणी करताना दिसत आहेत…



























