माहूर / नांदेड – क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी सामाज संघटनेसह विविध सामाजिक व युवक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने माहूर येथे आज दि.१५ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील भगवान बिरसा मुंडा चौकात हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेपुढे दीपप्रज्वलन करुन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या संघर्षमय आयुष्याचे व बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
स्थानिक आदिवासी समाज, विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच नगरातील विविध सामाजिक मंडळांनी रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम व परंपरागत नृत्यांच्या माध्यमातून आदिवासी क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुला–मुलींसाठी इतिहास व आदिवासी संस्कृतीवर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, तसेच पारंपारिक वाद्यवृंदाचा आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी बिरसा मुंडा यांचे विचार अनुसरण्याचा संकल्प केला.माहूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या आयोजनातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



















