तभा फ्लॅश न्यूज/अक्कलकोट : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा “जन्मा येणे घडे पातकाचे मूळ | संचिताचे फळ आपुलिया ||” या अभंगावर निरूपण करताना क्रियमाण कर्म, संचित आणि प्रारब्ध या तीनही संकल्पना सविस्तर विशद करून; “कर्मविपाक सिद्धांत” म्हणजे नेमके काय हे त्यांनी पूर्वरंगाच्या माध्यमातून अनेक दृष्टांत देऊन स्पष्ट केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला यांच्या पार्श्वभूमीवर; भगवान गोपालकृष्णांनी प्रत्येक जीवाला सुयोग्य कर्म करण्यास प्रवृत्त केले असे निरुपण कर्जत-रायगड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार “रायगड भूषण” ह.भ.प.श्रीराम अनंत पुरोहित यांनी केले.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात आज डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळी तर्फे १२७ वी मासिक सेवा मोठ्या भक्ती भावात संपन्न झाली. या प्रसंगी कीर्तनकार ह.भ.प.श्रीराम पुरोहित बोलत होते. कीर्तन सेवेच्या मध्यास मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार श्रीराम पुरोहित यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला.
या कीर्तन सेवेत मयुर स्वामी, अक्कलकोट यांनी संवादिनीवर तर श्री.सुनील शेलार सर, अंबरनाथ यांनी तबल्यावर श्री.पुरोहित यांना उत्तम साथसंगत केली. सकाळच्या सत्रात जप, नामस्मरण आणि मानसपूजा या सेवा स्वामीचरणी संपन्न झाल्या.
Post Views: 24