मंगळवेढा – शहर व ग्रामीण भागात दिवसभर ढग व ऊन असा नैसर्गिक पाठशिवणीचा खेळ सुरु असताना सायंकाळी अचानक ढगांचा गडगडाट करीत अनेक ठिकाणी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे हरभरा पिके शेतात काढून ठेवल्याने पिकांची हाणी झाल्याचे शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. भोसे येथे वीज पडून एका शेतकर्याची देशी गाय मृत पावल्याची घटना घडली आहे.
मुंबई येथील हवामान खात्याने बीड,धाराशीव हिंगोली,लातुर,नांदेड, परभणी येथे 30 ते 40 कि.मी वेगाने वारे वाहून वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. त्या प्रमाणे सोमवार रोजी दिवसभर ऊन व ढग असा निसर्गाचा पाठशिवणीचा खेळ सुरु होता. या दरम्यान सायंकाळी मंगळवेढा शहरावर ढगांचा गडगडाट करीत पावसाने हजेरी लावली. भाळवणी,मरवडे,अरळी, येड्राव, शिरनांदगी आदी ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या तसेच भोसे येथे वीज कडाडल्याने ती वीज एका शेतकर्याच्या देशी गाभण गायीच्या अंगावर पडल्याने ती जागीच मृत पावली. या घटनेचे वृत्त समजताच महसूल विभागाचे तलाठी सदर घटनास्थळी दाखल होवून पंचनामा प्रक्रिया सुरु होती.
सध्या सुगीचे दिवस असल्यामुळे मंगळवेढ्याच्या काळ्या शिवारात सवर्र्त्र हरभरा काढणीला वेग आला असून शेतामध्ये हरभरा काढल्याचे चित्र आहे. ज्वारी पिके काढणीला आल्याने या पावसामुळे ज्वारीची पिके ही धोक्यात सापडली आहेत. कणसामधील ज्वारीचा फुलोरा धुवून जाण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे. मराठी म्हणी प्रमाणे आई जेवू देईना बाप भिक मागू देईना अशी निसर्गाने अवस्था सध्या शेतकर्यांची केली असल्याच्या तिखट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. द्राक्षबागा,डाळिंब,आंबा,गव्हू, करडई याही पिकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मंगळवेढ्यात अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरुन वाहत असलेले पाणी छायाचित्रात दिसत आहे.
भोसे येथे वीज पडल्याने देशी गाय मृत पावल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
























