मध्यप्रदेशच्या हरदा येथील मगरडा रोडवरील बैरागढ रेहता इथल्या फटाक्यांच्या कारखान्यात आज, मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. यानंतर भयानक स्फोट होऊ लागले. हे स्फोट इतके जोरदार होते की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतीही हादरल्या. या घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय.
कारखान्यातील आगीची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, एकामागून एक सातत्याने स्फोट होत असल्यामुळे मदत आणि बचाव कार्यावर परिणाम होत आहे. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात 30 हून अधिक कामगार काम करत होते. जखमी आणि मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार हा फटाका कारखाना राजू अग्रवाल यांचा आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूची घरे कोसळली. अपघातानंतर वाहने उलटून जवळच्या रस्त्यावर पडली. काही लोकांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडले होते. मदत आणि बचाव कार्यासाठई एनडीआरएफ आणि एसडीआरएफची मदत घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी ऋषी गर्ग यांनी सांगितले.
फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर प्रशासनाने परिसरातील 100 हून अधिक घरे रिकामी केली आहेत. स्फोटाच्या धक्क्यामुळे जवळच्या रस्त्यावरून जाणारी वाहनेही काही अंतरावर फेकली गेली. परिसरात गोंधळाचे वातावरण आहे. कारखान्यातून उठणाऱ्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते. हरदा ते भोपाळ दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. फटाक्यांच्या कारखान्यातून जखमींना ग्रीन कॉरिडॉरद्वारे भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटल आणि एम्स भोपाळमध्ये आणण्याची तयारी सुरू आहे. फटाक्यांच्या कारखान्यातील स्फोटात जखमी झालेल्या काही लोकांना हरदा जिल्हा रुग्णालयातून भोपाळला रेफर करण्यात आले आहे. हा अपघात इतका मोठा होता की हरदा जिल्ह्यात रुग्णवाहिकांची कमतरता होती. नर्मदापुरम आणि खंडवा येथील रुग्णवाहिकाही हरदा येथे पाठवण्यात आल्या आहेत. लोकांना भोपाळ आणि इंदूरमध्ये उपचारासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
हरदा स्फोटाबाबत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी तातडीची बैठक बोलावली. याशिवाय मंत्री उदय प्रताप सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना हरदा येथे रवाना होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले