सोलापूर – विजापूर रोडवरील १००८ श्री भगवान बाहुबली दिगंबर जैन मंदिरात बाहुबली भगवंतांचा २२वा महामस्तकाभिषेक व वार्षिकोत्सव धार्मिक व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी सकल जैन समाजाची उपस्थिती होती.
या मंदिरात आठ फूट उंचीची ही मूर्ती राजस्थानातील जयपूर येथून आणून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. महामस्तकाभिषेकापूर्वी निकिता व रोहन पंढरे यांच्या हस्ते मंडप उद्घघाटन आणि डॉ. प्रियांका व सुरज व्हसाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दिपाली व महावीर मोहोळकर यांच्या हस्ते भगवान बाहुबलीच्या फोटोचे अनावरण तर डॉ. मीनल व नितीन पांढरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या नंतर भ. आदिनाथ, भ. मुनिसुव्रतनाथ, भ. पार्श्वनाथ व भ. बाहुबली स्वामींच्या महामूर्तीचा पंचामृत अभिषेक धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
मानाचा शाश्वत महामस्तकाचा मान ज्योती व सुधीर पंडित परिवाराला देण्यात आला होता. पंडित माणिक उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मांगलिक कार्यक्रम पार पडले. या सोहळ्यासाठी बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सुधीर पंडित, सचिव अनिल माणिकशेटे, उपाध्यक्ष डॉ. कैलास बोंदार्डे, विश्वस्त डॉ. अजित माणिकशेटे, धीरज पंडित, अरविंद शहा, णमोकार महामंडळ व सेवा समितीचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन सहसचिव सुनील गांधी यांनी केले. अभिषेकानंतर महा शांतिमंत्र व आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. संयुक्त, केवली, संजना व धीरज पंडित परिवाराच्या वतीने महा प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
——-
कर्नाटकातील श्रवणबेळगोळप्रमाणे महामस्तकाभिषेक सोहळा
कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे बारा वर्षातून एकदा भगवान बाहुबली मूर्तीचा महामस्तकाभिषेक सोहळा होतो. त्याच धरतीवर वर्षातून एक वेळेस या मंदिरात महामस्तकाभिषेक सोहळा होतो. श्रवणबेळगोळप्रमाणेच हा महामस्तकाभिषेक सोहळा झाला. यात जल, नारळ पाणी, हरभरा दाळ, साखर, गूळ,केशर, ड्रायफूड, बदाम, मनुके,अक्रोड, पिस्ता,विल्याची, खडीसाखर, तूप, दूध, खोबरे खिस,उसाचा रस, डाळिंबाचा रस , दही, सर्व वन औषधी, कर्कचूर्ण या पदार्थांचा अभिषेक झाला. शेवटी गुलाब फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली.



















