सांगोला – महाराष्ट्रात वाढत चाललेली शिवराळ भाषा, जातीय द्वेष व असभ्य वर्तन यासाठी राज्यात स्वतंत्र आचारसंहिता लागू करा, सर्व प्रकारच्या आंदोलनासाठी सुसंवाद कार्यपद्धती निश्चित करा, अधिकाऱ्यांनी जनतेशी नीट बोलावे नीट वागावे यासाठी स्वतंत्र आदेश पारित करा, प्रसार माध्यमांनाही स्वतंत्र आचारसंहिता लागू करा यासह महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण चौदा मागण्यांसाठी मी गुरुवार दि.६ नोव्हेंबर रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र उपोषण करीत असल्याची माहिती किसान व वॉटर आर्मीचे प्रफुल्ल कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनेचे माजी खा.राजू शेट्टी, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र कराळे, ॲड.असीम सरोदे आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अनेक भजनी मंडळी त्या ठिकाणी येऊन महाराष्ट्र राज्यासाठी विठ्ठल नामाचा गजर करणार आहेत.
सांगोला व तालुक्यातील सर्व माजी सैनिक यांच्या हस्ते तसेच प्रा.पी.सी.झपके, डॉ.शिवाजीराव ढोबळे व कल्पनाताई शिंगाडे यांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभंगवाणीने प्रफुल्ल कदम यांच्या उपोषणाची सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या उपोषणाची सांगता होणार आहे. तरी या उपोषणास महाराष्ट्रातील सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन किसान व वॉटर आर्मीच्या वतीने करण्यात आले आहे.



























