सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सोमवारपासून होणाऱ्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश हा सामन्यासाठी दोन्ही संघ सोलापुरात दाखल झाले असून त्यांनी रविवारी सकाळच्या सत्रात सराव केला असून सामानाधिकारी, पंच, गुणलेखक, व्हिडिओ अनालिस्ट व अँटी करुप्शन अधिकारी हे देखील दाखल झाले आहेत.
नुकतेच सोलापूर मनपाने इंदिरा गांधी पार्क स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे हस्तांतरित केल्यानंतर हा सामना पार पडत असून सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून दोन्ही संघांनी सराव केल्यावर व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.
लाल चेंडूवर आणि पांढऱ्या पोशाखात खेळला जाणारा हा सामना ४ दिवसीय असल्याने कसोटी क्रिकेटच्या फॉरमॅट मध्ये खेळवला जाणार असून १ डिसेंबर रोजी व पुढील दिवस सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन ३ सत्रात खेळ होणार असल्याचे संघटनेच्या वतीने नागरिकांना पाहता यावे म्हणून सर्वांना खुला प्रवेश देण्यात येणार आहे.
सोलापूरचे विशाल कुलकर्णी हे हिमाचल प्रदेश संघाचे तर पंढरपूरचे ज्योतिबा वाघ हे महाराष्ट्र संघाचे स्थानिक व्यवस्थापक म्हणून काम पाहत असून एमसीएच्या वतीने नवनियुक्त अमोघ जगताप, प्रसाद शावंतुल हे तसेच नवीन माने हे मॅच ऑफिसिअल यांचे स्थानिक व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. सामन्यासाठी गुणलेखक म्हणून पुण्याचे मंगेश नाईक, केतकी जामगावकर हे तर व्हिडिओ ॲनालिस्ट म्हणून सातारा चे मयूर कांबळे व असिस्टंट सदानंद प्रधान असणार आहेत.

























