माढा : तालुक्यातील रणदिवेवाडी येथे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात शिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या २५ वर्षापासून या मंदिरात गावकऱ्यांच्या वतीने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो.लोकवर्गणीतून या मंदिराची उभारणी केले असून या मंदिराचे सभामंडप माढा तालुक्याचे तत्कालीन आमदार बबनराव शिंदे यांच्या निधीतून उभारण्यात आला आहे. रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी अबाल वृद्ध व स्त्री पुरुष भाविक भक्ताने मोठी गर्दी करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले.
या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. सोमवारी काल्याच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या ठिकाणी दोन दिवस झालेल्या धार्मिक कार्यक्रमाने मंदिर व परिसरातील वातावरण भक्तीमुळे झाले होते.





















