तभा फ्लॅश न्यूज/ आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या आराखड्यात मापटेमळा परिसरातील शेतजमिनींवर कचरा डेपो, मैदान, उद्यान आदींसाठी आरक्षण टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ मापटेमळा ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी आटपाडी नगरपंचायतीतून वगळण्याची जोरदार मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी राज्य शासनासमोर स्पष्ट पर्याय ठेवले आहेत. आटपाडी, मापटेमळा, भिंगेवाडी यांसह ९ गावांची समृद्ध नगरपालिका करा, अन्यथा मापटेमळ्यासह पूर्वीच्या स्वतंत्र तीन ग्रामपंचायती पुन्हा अस्तित्वात आणा.
गावकऱ्यांचा संताप उफाळला
मापटेमळा ग्रामस्थांनी ८५० जणांच्या उपस्थितीत सांगितले की, “आमच्या जमिनींवर जबरदस्तीने आरक्षण टाकून आम्हाला नगरपंचायतीत ढकलले जात आहे. हे अन्यायकारक असून आम्हाला नगरपंचायतीतून बाजूला काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करू.” ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या गेटसमोर प्रपंच थाटण्याचा इशारा दिला आहे.
पक्षपाती समावेशाचा आरोप
मापटेमळा, भिंगेवाडी, यप्पावाडी, देशमुखवाडी, खांजोडवाडी, मुढेवाडी, मासाळवाडी, पुजारवाडी यांचा पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीत समावेश होता. मात्र पुजारवाडीचा समावेश नगरपंचायतीत केला नाही, तर मापटेमळ्यासारख्या भागाला जबरदस्तीने अंतर्भूत केले गेले. यात राजकीय पक्षपातीपणा दिसतो, असा आरोप ग्रामस्थांनी केला.
आटपाडीकरांचा ऐतिहासिक हक्क
खाटीक यांनी नमूद केले की, १९३७ मध्ये औंध संस्थानच्या काळातही आटपाडीत म्युनिसिपल ऑफिस (नगरपालिका) अस्तित्वात होती, याचा पुरावा नगरपंचायतीच्या इमारतीवरील शिळालेखावरूनही मिळतो. तेव्हा जर ९० वर्षांपूर्वी नगरपालिका अस्तित्वात होती, तर आज ती का नाही, असा सवाल त्यांनी केला.
मागण्या ठाम : निर्णय राज्यकर्त्यांचा
“मापटेमळा, भिंगेवाडी, यप्पावाडी, मुढेवाडी, देशमुखवाडी, खांजोडवाडी, मासाळवाडी, पुजारवाडी आणि आटपाडी या ९ गावांची एकत्रित नगरपालिकाच स्थापन करा, अन्यथा पुन्हा स्वतंत्र ग्रामपंचायतीची पुनर्बांधणी करा.”
“जनतेचा रोष उग्र आहे, लोकशाही मार्गाने हा अन्याय दूर केला पाहिजे,” असे सादिक खाटीक यांनी शेवटी नमूद केले.