सोलापूर – अतिवृष्टी व महापूरामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे कोलमडून पडले आहे. अशा स्थितीत शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून तरतूद करण्यात यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी पूरबाधित शाळांचे झालेले नुकसान विचारात घेऊन त्या शाळांना सुविधा द्याव्यात, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया राबवावी, पदवीधर शिक्षकांच्या वेतनत्रुटी दूर कराव्यात, तालुका अंतर्गत समायोजन प्रक्रियेतील तक्रारीची चौकशी करावी, पात्र विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, आदी विषयांवर चर्चा झाली.
यावेळी कक्ष अधिकारी बसवराज स्वामी, गटशिक्षणाधिकारी सुषमा सुरेश पवार, दयानंद कवडे, पुणे महामुनी, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विभागीय उपाध्यक्ष मो. बा. शेख, विभागीय अध्यक्ष अन्वर मकानदार, ज्येष्ठ नेते पंडित कोरे, राजन ढवण, अस्लम इनामदार आदी उपस्थित होते.


















