आटपाडी – कृषी प्रधान देश आणि शेतकरी मालक असलेल्या भारतात शेती, शेतकरी, व्यापारी, हमाल, तोलायतदार, पशु आणि पालक यांच्या सर्वांगीण, चौफेर विकास आणि कार्यक्षेत्राच्या परिवर्तनासाठी देश – राज्यातल्या मार्केट कमेट्यांना ५ साखर कारखान्याच्या ताकदीएवढे सक्षम बनवा . असे आवाहन निवेदनाद्वारे आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी केंद्र, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींना केले आहे .
प्रत्येक मार्केट कमिटीच्या नियंत्रणाखाली माती परिक्षण केंद्र, कृषी विद्यालय, प्रक्रिया करणारे विविध उद्योग, शेळ्यामेंढ्या वर्गातल्या जनावरांचे एक्सोर्ट दर्जाचे मटनासाठीची कारखानदारी, मिनी कृषी विद्यापीठ, शेतमाल व जनावरांची वाहतूक करणारी शासनमान्य यंत्रणा सुरु केल्या पाहिजेत .
शेतीमालाची आणि जनावरांच्या वेगवेगळ्या मार्केट कमिट्या विभागत प्रत्येक मार्केट कमिटीला १०० एकराचे आवार आणि ५०० कोटीचे अनुदान द्यावे .
उनवारा, वादळ, पाऊस, लक्षात घेऊन भाजीपाला, अन्नधान्य, फळफळावळ, शेळ्यामेंढ्या आणि मोठ्या जनावरांचे आठवडा बाजार, जनावरांच्या खरेदी विक्रीच्या यात्रा या रेल्वे प्लॅटफॉर्म सारख्या प्रचंड उंच, लांब, रुंद, मजबुत आच्छादनाखाली भरविल्या पाहिजेत.
वाहनांसाठी पार्किंग, सर्वांसाठी मुताऱ्या, सुलभ शौचालये, मुक्कामी येणाऱ्या किमान हजार लोकांसाठी प्रशस्त विश्रांतीगृह, पैशाच्या सुरक्षिततेचे लॉकर, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मंत्रालयातल्या स्वस्ताईच्या दरात चहा नाष्टा जेवण उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी व्हावी .
शेतीमाल व जनावरांसंदर्भातल्या सर्व बाजुंनी जगभरातल्या अपडेट क्षणात समजणेसाठी प्रत्येक आवारात प्रचंड आकाराचे सदैव चालु राहणारे डिजीटल फलक लावले जावेत . शेतकरी पशुपालक यांना परिपूर्ण बनविणारी शिबीरे, चर्चासत्रे, व्याख्यानमाला, पशु – पक्षी – शेतमालाची प्रदर्शने प्रत्येक मार्केट कमिटीने भरविलीच पाहिजेत .
मार्केट कमिटीशी संलग्न शेतकरी, पशुपालक, व्यापारी, वगैरे मधील उत्तमोत्तमांचा राज्याच्या, देशाच्या स्तरावरील सर्व शासकीय सन्मान, पुरस्कार, पदकांसाठी आवर्जून विचार व्हावा . या सर्वांसाठी प्रत्येक सन्मान पदकांची संख्या वाढविली जावी . साठीनंतर शेतकऱ्याला प्रवास, दवाखाना, अन्नधान्य मोफत दिले जावे . सर्वच बाजुनी पोतराज अवस्थेत ढकलले गेलेल्या शेतकरी पशुपालकांना भरीव वृध्दापकाळ पेन्शन सुरू केली जावी . अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त केली .